एकाच कुटुंबातील नऊ जणांचा होरपळून मृत्यू

अंधेरी (प.) येथील जुहू गल्लीतील औषधांच्या दुकानाला गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत नऊ जणांचा होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. दुकानाला आग लागल्यानंतर काही क्षणातच दुमजली इमारत आगीच्या विळख्यात पडली. त्यामुळे औषधाच्या दुकानाच्या मालकाच्या कुटुंबातील केवळ तिघे बचावले. मात्र पाच लहान मुलांसह आठ जणांचा धुरामुळे गुदमरून झाला. तर होरपळलेल्या एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. चिंचोळ्या वाटेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी मदतकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

जुहू गल्लीजवळील वायरलेस रोडवरील दुमजली निगम मिस्त्री चाळीच्या तळमजल्यावर मोहोज्जम खान यांचे औषधांचे दुकान होते. दुकानाच्या वरच्या दोन मजल्यांवर मोहोज्जम खान आपल्या कुटुंबासह राहात होते. गुरुवारी सकाळी ६च्या सुमारास औषधाच्या दुकानात आग लागली आणि काही क्षणात आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. धुरामुळे आणि दुकानात फटाक्यासारखे आवाज येत असल्याने मोहोज्जम खान आणि त्यांच्या दोन मुलांना जाग आली. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. मोहज्जम खान आणि त्यांची दोन मुले घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र खान यांच्या कुटुंबातील नऊ जण इमारतीतच अडकले होते. घरावर बसविण्यात आलेल्या लोखंडी ग्रिलमुळे या नऊ जणांना घराबाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत मोहोज्जम खान यांच्या कुटुंबातील सबुरिया मोझिन खान (५२), सिद्दिक खान (३५), राबिल खान (२८), मोझील खान (८), उन्नीहाय खान (५), अलिझा खान (४), तुब्बा खान (८), अल्ताझ खान (३) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. तर आगीत ४५ टक्के भाजलेल्या साबिया खान (२८) यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. तब्बल एक तासाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. खान यांच्या घरामध्ये स्वयंपाकाचे दोन गॅस सिलिंडर होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याची फवारणी करीत आगीवर नियंत्रण मिळविल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही. या सिलिंडरचा स्फोट झाला असता तर औषधांच्या दुकानाच्या एका बाजूला प्लास्टिकच्या वस्तूंचे, तर दुसऱ्या बाजूला चहाचे हॉटेल यासह आजूबाजूची घरेही उद्ध्वस्त झाली असती. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारांनंतर घरी सोडण्यात आले.

अग्निशमन दलाला उशीर

आग भडकताच दोन्ही मजल्यांवर धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरात घुसमटणारी लहान मुले मदतीसाठी आरडाओरड करीत होती. परंतु मोहोज्जम खान आणि त्यांची दोन मुले आग विझविण्यात मग्न होते. त्यामुळे कुटुंबातील लहान मुलांच्या आक्रोशाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यातच या दोन मजली इमारतीला लोखंडी ग्रिल लावण्यात आले होते. त्यामुळे घरात अडकलेल्यांना बाहेर पडता आले नाही, असे प्रत्यक्षदर्शी अब्दुल शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या वस्तीपासून अग्निशमन दलाचे केंद्र अवघ्या दहा मिनिटांवर आहे. पण आगीची वर्दी दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचली नाही, असा आरोप संतप्त रहिवासी शाकीर अली यांनी केला आहे.

अवघ्या पाऊण तासात..

रमझानचा महिना असल्याने खान कुटुंबीय पहाटे पाचच्या सुमारास नमाज पढून व उपवास सोडून नुकतेच झोपले होते. त्यानंतर पाऊण तासातच शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण घराला आगीने वेढले. अवघ्या पाऊण तासातच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.