कचऱ्यातील धातू वेगळा करण्यासाठी प्रकार; आणखी व्यापाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

देवनार कचराभूमीला लागणाऱ्या आगीमागचे गूढ उकलण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश मिळाले आहे. भंगार वस्तूंमधील धातू वेगळ्या करण्यासाठी त्यांना कचराभूमीवर जाऊन जाळण्यास सांगितल्याने या आगी लागल्याचे स्पष्ट होत असून याप्रकरणी ९ भंगार व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. व्यापाऱ्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखी भंगार व्यापाऱ्यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

देवनार येथे असलेल्या कचराभूमीला गेल्या काही महिन्यांपासून सतत लागणाऱ्या आगीमुळे केवळ शिवाजी नगरच नव्हे तर चेंबूर, मानखुर्द, वाशी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याप्रकरणी डिसेंबर २०१५ मध्ये एक तर २०१६ च्या वर्षांत दोन गुन्हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.  पोलिसांनी कचराभूमीच्या संपर्कात येणाऱ्या २५ हून अधिक भंगार गोळा करणारी मुले, रहिवासी यांची चौकशी केली. त्यात कचराभूमीला लागून असलेल्या अनधिकृत भंगार व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कचराभूमीलालागूनच दुकान थाटलेले अनधिकृत भंगार विक्रेते त्यांच्याकडे भंगार वस्तू विकण्यासाठी घेऊन येणाऱ्या व्यक्तींना त्यातून धातू वेगळा करुन देण्यास सांगतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरण्यात आलेल्या तांब्यांच्या तारा, इतर धातूपदार्थ विलग करण्यासाठी मग हाकेच्या अंतरावर असलेल्या कचराभूमीमध्ये जाण्यास सांगण्यात येते, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ सहा) संग्रामसिंह निशाणदार यांनी स्पष्ट केले. कचरावेचक मुले तसेच भंगार घेऊन येणाऱ्या व्यक्ती या वस्तूंना जाळत असताना कचराभूमीत अनेकदा आग लागल्याचे ते म्हणाले. कचरावेचक मुलांनीही आपण कचराभूमीत धातू वेगळे करण्यासाठी वस्तू जाळत असताना कचरा लागल्याचे पोलिसांपुढे मान्य केल्याचे कळते. वस्तू जाळत असताना कचराभूमीत असलेल्या ज्वलनशील मिथेन वायूचा संपर्क आल्याने आग भडकल्याची शक्यता आहे.  त्याला कचराभूमीत जाऊन आग लावण्यास प्रवृत्त करणाऱ्या ९ भंगार व्यापाऱ्यांना शुक्रवारी अटक केले. शमीम खान, उमर गनी खान, हुसेन शेख, अलीबाबा शेख, सोहेल शेख, शोएब शेख, राजेश महाडिक, जयप्रकाश यादव, मोहम्मद शेख अशी या व्यापाऱ्यांनी नावे आहेत.

आगीच्या चौकशीचा अहवाल लवकरच

देवनार कचराभूमीवर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व) यांना दिले होते. या चौकशीचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे कळते. एकीकडे शिवाजी नगर पोलिसांनी आग लागण्यास कोण जबाबदार होते याचा तपास लावला असताना वारंवार लागणाऱ्या आगीमागची कारणे या अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच आगी लागू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयीही या अहवालात सूचना मांडण्यात येतील