मुंबईत गुरुवारी दिवसभरात ९७ करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ४३ मृत्यू  ७ जूनपूर्वीचे आहेत. मृतांपैकी १० रुग्णांचे वय ४० वर्षांंपेक्षा कमी होते. मात्र मुंबईतील आतापर्यंतचा करोनाबळींचा आकडा १९५२ वर गेला आहे. त्याचबरोबर आणखी १५४० नवीन रुग्ण आढळले असून बाधितांचा आकडा ५३,९८५ झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दुसऱ्या बाजूला मोठय़ा संख्येने नवीन रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा सतत वाढतो आहे. गुरुवारी बाधितांचा आकडा ५३ हजाराच्या पुढे गेला. तर आणखी ७३१ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. तर ५१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २४,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर २७,८२४ सक्रिय रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.

बुधवारी ज्या ९७ मृत्यूंची नोंद झाली त्यापैकी ४३ मृत्यू हे ७ जूनपूर्वीचे आहेत. या ९७ पैकी ६५ रुग्णांना करोनाबरोबरच दमा, दयविकार, उच्च रक्तदाब असे अन्य दीर्घकालीन आजार होते. यात ६३ पुरुष व ३४ महिला होत्या. यात १० जण हे ४० वर्षांखालील होते.  तर ५३ जणांचे वय ६० वर्षांवरील होते.

धारावीतील ९९६ रुग्ण करोनामुक्त

धारावीमधील ९९५ करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. धारावीमधील २० रहिवाशांना गुरुवारी करोनाची लागण  झाली असून बाधितांची संख्या एक हजार ९८४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीमधील ७५ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.  धारावीमध्ये मोठय़ा प्रमाणावर करोनाचा संसर्ग वाढत होता. मात्र पालिकेने केलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गेल्या आठवडय़ापासून तेथील करोना फैलाव आटोक्यात येत आहे.