वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ९९० वाहनचालक दोषी; २३५ प्रकरणांत चालकांवर परवाना निलंबनाची टांगती तलवार

सुशांत मोरे, मुंबई</strong>

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करणाऱ्या परिवहन विभागाने आता अ‍ॅपआधारित खासगी टॅक्सींकडे मोर्चा वळवला आहे. प्रवाशांच्या तक्रारींवरून मुंबई विमानतळाबाहेर राबवलेल्या विशेष मोहिमेत ९९० वाहनचालकांवर कारवाई केली. यापैकी २३५ प्रकरणांत चालकांवर परवाना निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात अ‍ॅपवर चालणाऱ्या खासगी टॅक्सींची मागणी जसजशी वाढू लागली आहे, तसतसा त्यांचा मनमानी कारभारही वाढतो आहे. सध्या मुंबईत अशा ५० हजारांहून अधिक टॅक्सी कार्यरत आहेत. त्यात रिक्षाही मोठय़ा संख्येने उतरत आहेत. काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, रिक्षा वेळेत उपलब्ध न होणे यामुळे प्रवासी अ‍ॅपआधारित टॅक्सींकडे वळला. मात्र या चालकांकडूनही मनमानी होऊ लागल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे येत आहेत.

एखाद्या प्रवाशाने अ‍ॅपवरून टॅक्सी आरक्षित केल्यास ती काही वेळा तत्काळ आरक्षित होते. परंतु काही वेळा प्रवाशाने टॅक्सी आरक्षित केल्यानंतर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते आणि आयत्यावेळी चालकाकडून सेवा रद्द केल्याचा संदेश मोबाइलवर प्राप्त होतो. त्यामुळे प्रवाशाला मनस्ताप होतो. त्यातही प्रवाशाने काही कारणास्तव सेवा रद्द केली, तर प्रवाशाचे पैसे खात्यातून जाऊन भुर्दंड पडतो. अनेकदा महागडय़ा भाडय़ासाठी रात्रीबेरात्री प्रवाशाला भाडे रद्द करण्यासाठी दबाव आणला जातो. मात्र या तक्रारींवरून अ‍ॅपआधारित टॅक्सींवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे ही मनमानी वाढली होती.

अशा टॅक्सीचालकांकडे परवाना किंवा बॅच नसणे, लॉग बुक न बाळगणे, पर्यटन चिन्ह प्रदर्शित न करणे अशा विविध प्रकरणांत कारवाई करण्याची विशेष मोहीम परिवहन विभागाने १५ ऑक्टोबरपासून हाती घेतली. ही मोहीम मुंबई विमानतळाबाहेरच घेण्यात आली. कारण याच ठिकाणी या तक्रारींची संख्या मोठी होती. यात विविध प्रकरणांत ९९० वाहने दोषी आढळल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. यातील २३५ प्रकरणांत परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.  चालकांकडून २१,७७,४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनात लॉग बुक असणे बंधनकारक आहे. लॉग बुकमध्ये चालकाचे नाव, वाहन क्रमांक, वाहन किती वाजता काढले व किती वाजता पोहोचले इत्यादी माहिती नमूद केली जाते. मात्र तेच वाहनात नव्हते. अशा ९१० प्रकरणांत लॉग बुक न बाळगल्याचे निदर्शनास आले आहे.

अ‍ॅपआधारित टॅक्सीचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली.

   -शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

 

अ‍ॅप आधारित टॅक्सींवर केलेल्या कारवाईत ९९० वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून पुढीलप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

* ३३५ विना बॅच वाहतूक करणारी वाहने.

* ६८० बॅच प्रदर्शित न करणे.

* ८१० पर्यटन चिन्ह प्रदर्शित न करणे.

*  ४३६ अग्निशमन यंत्रणांची वैधता संपणे.