13 August 2020

News Flash

८६ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत

या रुग्णांमार्फत प्रसार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत

संग्रहित छायाचित्र

राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये ८६ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ४ हजार ७५१ चाचण्यांमधील हे सर्वेक्षण असून याव्यतिरिक्त करोनाची लागण झालेले आणि लक्षणे नसलेल्या अनेक व्यक्ती समाजात संसर्गाचा प्रसार करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यात करोनाबाधित १८० रुग्णांची तपशीलवार माहिती अहवालात आहे. त्यात १५५ रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यातील कोणतीही लक्षणे अजून दिसून आलेली नाहीत. केवळ २२ रुग्णांना ही लक्षणे आढळलेली आहेत. एकूण रुग्णांमधील जवळपास १३० हून अधिक रुग्ण हे २१ ते ५० वयोगटातील आहेत. १५५ जणांच्या शरीरात विषाणूने प्रवेश केला असला तरी सक्षम प्रतिकारशक्तीमुळे शरीरात संरक्षण प्रतिद्रव्ये (अण्टीबॉडी) तयार होतात. ही विषाणूचा सामना करत असल्याने त्यांच्या शरीरावर विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत, हे यावरून स्पष्ट होते.

८६ टक्के जणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत आणि रुग्णांची वाढती संख्या यावरून अनेक जणांमध्ये विषाणू कार्यरत आहे असे नाकारता येत नाही. अशी लक्षणे नसलेल्या आणि बाधित व्यक्ती विषाणूचा प्रसार करत आहेत, हे वास्तव असल्याचे फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले.

टाळेबंदी किंवा साथसोवळं हाच पर्याय

विषाणूंचा परिणाम बहुतांश रुग्णांवर जाणवत नसला तरी यांच्या संपर्कात येणारे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार इत्यादी विकारांचे रुग्ण  या जोखमीच्या गटातील व्यक्तींमध्ये संसर्ग प्रसार होत आहे . एक व्यक्ती चार जणांना प्रसार करतो असे उदाहरण घेतले तर चार जण १६ जणांना, १६ जण २५६ जणांना आणि २५६ चे १०२४ असा संसर्ग फैलावत जातो. परंतु जर एका व्यक्तीने दोघांना, त्यांच्याकडून चार जणांना, चाराचे आठ, आठाचे १६ आणि १६ जणांकडून ३२ जणांना लागण होते. आता १०२४ पर्यंत प्रसार होण्यापेक्षा ३२ जणांना झाली तर नियंत्रण सोपे आहे. म्हणूनच टाळेबंदी  पाळण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचे मत हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.

अधिकाधिक चाचण्या करणे गरजेचे

सध्या समाजात या विषाणूचा प्रसार कसा आणि कुठे होत आहे, याचे अनुमान लावण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे आवश्यक आहे. रुग्णांचे निदान वेळेत झाल्यास विलगीकरण मोठय़ा प्रमाणात होईल आणि प्रसार रोखण्यास मदत होईल, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:48 am

Web Title: about 86 percent of the patients have no symptoms abn 97
Next Stories
1 वीजदरांवरून तज्ज्ञांचे टीकास्त्र, तर भाजप श्रेयासाठी सरसावला
2 अर्थसंकल्पात आरोग्य खात्याला दुय्यमच स्थान
3 करोनामुळे मुख्यमंत्र्यांवर आणखी एक संकट!
Just Now!
X