News Flash

खैरे – सत्तार वादावर, संजय राऊत म्हणतात…

जेव्हा बाहेरुन पाठिंबा घेतला जातो, तेव्हा त्याची किंमत मोजावी लागते, असं देखील सांगितलं.

महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री यांच्या नाराजी व राजीनामा नाट्यावर व शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांना गद्दार असे संबोधल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे भांडण तिकडचं जुनं आहे, आत्ताचं नाही. तिकडे एकमेकांविरुद्ध संघर्ष झालेला आहे, पाडापाडी झालेली आहे. आता यातून कसा मार्ग काढायचा हे नंतर पाहिलं जाईल, परंतु चंद्रकांत खैरे यांच्या भावना समजून घ्याव्यात या मताचा मी आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आमदार अब्दुल सत्तार हे अचानक पक्षात आले, आम्ही त्यांना केवळ शिवबंधन बांधताना मातोश्रीवर पाहिलं. अगोदर ते काँग्रेसमध्ये अनेक वर्षे होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या फार जवळचे, अशी त्यांची ख्याती होती. नंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, परंतु शेवटी ते शिवसेनेत आले. त्यांनी शिवबंधन बांधलं आणि आता मरेपर्यंत मी शिवसेनेत राहीन, भगवा सोडणार नाही. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी मातोश्रीवर केल्याचं मी वाचलं आहे आणि ऐकलं आहे. त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे. चंद्रकांत खैरे हे आमचे नेते आहेत व अन्य देखील काही प्रमुखजण संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये आहेत. हे भांडण तिकडचं जुनं आहे. आत्ताचं नाही. तिकडे एकमेकांविरुद्ध संघर्ष झालेला आहे, पाडापाडी झालेली आहे. आता यातून कसा मार्ग काढायचा हे नंतर पाहिलं जाईल, परंतु चंद्रकांत खैरे यांच्या भावना समजून घ्याव्यात या मताचा मी आहे, असं संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

…तेव्हा प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक आमदाराने ही किंमत मोजली पाहिजे –
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा,असं आमचं सर्वांचा स्वप्न होतं व पडेल ती किंमत देऊन व्हावा, असं जेव्हा आम्ही म्हणतो. तेव्हा प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक आमदाराने ही किंमत मोजली पाहिजे. या सरकारला बहुमत प्राप्त करण्यासाठी काही बाहेरच्या लोकांची गरज आहे. जेव्हा बाहेरून पाठिंबा घेतला जातो, तेव्हा त्याची किंमत मोजावी लागते. ती भाजपाने मोजली असती. विरोधीपक्षात बसण्यापेक्षा आपण सत्ताधारी पक्षात आहोत, याचा आपल्याला अभिमान व महत्व वाटायला पाहिजे. सत्तेचे आपण वाटेकरी असल्यामुळे, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मंत्रालयात एक मान मिळतो. त्यांची कामं होतात, त्यांच ऐकलं जातं. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. असंही राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 3:31 pm

Web Title: about khaire and sattar conflict sanjay raut says msr 87
Next Stories
1 कसरत पूर्ण झाली, आता सर्कस कामाला लागली : राऊत
2 राजीनामा दिलेला नाही; ‘हितचिंतकां’कडून अफवा पसरवणे सुरू : सत्तार
3 रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Just Now!
X