कोकणवासीयांसाठी यंदा गणेशोत्सवादरम्यान प्रवासात आकर्षण म्हणून चालवलेल्या वातानुकुलित डबलडेकर गाडीच्या दुसऱ्या फेरीत रविवारी मालगाडी घसरण्याचे विघ्न आले. पहिल्या फेरीत रोहा स्थानकात तासभर खोळंबलेली ही गाडी दुसऱ्या फेरीदरम्यान पनवेललाच रद्द करावी लागली. ही गाडी पनवेलहून पुन्हा लोकमान्य टिळक टर्मिनसकडे वळवण्यात आली. डबलडेकर गाडीच्या पहिल्यावहिल्या आणि ऐतिहासिक फेरीत रोहा स्थानकावर मध्य रेल्वेच्या इंजिन चालकाने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे ही गाडी पहिल्याच फेरीत रोहा स्थानकात एक ते दीड तास खोळंबली. या निमित्ताने कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनांमध्ये असलेला समन्वयाचा अभावही ठळकपणे दिसून आला होता. या पाश्र्वभूमीवर रविवारी सकाळी निघालेली डबलडेकर गाडीची दुसरी फेरी पनवेलला वेळेत पोहोचली खरी, पण पनवेल स्थानकात ही गाडी बराच वेळ खोळंबून राहिली.