|| सुशांत मोरे

२०१९ पर्यंत दाखल होणारा १० विनावातानुकूलित गाडय़ांचा ताफा शेवटचा

मुंबईतील रेल्वेच्या शेवटच्या १० विनावातानुकूलित गाडय़ांचा ताफा २०१९ पर्यंत दाखल होणार असून त्यानंतर मुंबईत येणारी प्रत्येक नवीन गाडी वातानुकूलित असेल. थोडक्यात २०१९ नंतर मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेचे ‘वातानुकूलिनीकरण’ होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. घामांच्या धारा पुसत कार्यालय गाठणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना हा मोठा दिलासा असून त्यानंतर प्रश्न राहील तो फक्त रेल्वेच्या तिकीट दराचा!

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर डिसेंबर, २०१९ नंतर येणाऱ्या लोकल या वातानुकूलितच असणार आहेत. त्याआधी शेवटच्या साध्या १० लोकल दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आयसीएफमधील (इंटिग्रल कोच फॅक्टरी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्याच्या घडीला एकूण १०० लोकल असून यामध्ये एका वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे, तर मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४२ गाडय़ा असून त्या मुख्य आणि हार्बर मार्गावर धावतात. गेल्या वर्षी २५ डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. या गाडीनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने येत्या पाच ते सहा वर्षांत सर्व सेवा वातानुकूलित देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-३ अंतर्गत चार वर्षांत ४७ वातानुकूलित गाडय़ा, तर एमयूटीपी-३ ए अंर्तगत २१० वातानुकूलित गाडय़ा मुंबईत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांना वातानुकूलित लोकल गाडीचे भाडे परवण्यासारखे असावे यासाठी सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे बिगरवातानुकूलित असलेल्या गाडय़ाही चालवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सध्या धावत असलेल्या साध्या गाडय़ांनाच वातानुकूलित लोकलचे डबे जोडले जातील. पुढील वर्षांच्या मार्चपासून त्यावर काम केले जाईल. त्यामुळे पुढील पाच ते सहा वर्षांत मुंबईत वातानुकूलित लोकल गाडय़ाच धावताना दिसतील.

तत्पूर्वी मुंबईत शेवटच्या साध्या दहा लोकलही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भेल कंपनीच्या या लोकल गाडय़ांची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये होत आहे. सध्या भेल कंपनीची एक लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहे, तर आणखी दहा लोकल गाडय़ांपैकी एक लोकल येत्या डिसेंबपर्यंत येईल. उर्वरित लोकल या टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०१९ पर्यंत येतील.