मानखुर्दजवळ टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे सध्या सायन- पनवेल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मानखुर्द उड्डाणपुलावरून जाणारा एक टँकर थेट पुलावरून खालच्या रस्त्यावर कोसळला. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पहाटेची वेळ असल्यामुळे सुरूवातीला याठिकाणी वाहनांची ये-जा काही प्रमाणात सुरू होती. मात्र, सकाळी नऊ वाजल्यानंतर वाहनांचा ओघ वाढल्यानंत याठिकाणी वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात झाली. हा ट्रक उचलण्यासाठी मागविण्यात आलेली क्रेन येण्यास उशीर झाल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली. त्यामुळे सकाळपासूनच या मार्गावरील देवनार सर्कलपासून ते माहुलपर्यंतच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. दरम्यान, हा टँकर सध्या हटविण्यात आला असला तरी सध्या या मार्गावरील संथगतीने सुरू आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 2:48 pm