‘आदर्श’ प्रकरणी दोषींना क्षमा नाही, भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यावर पुन्हा चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केले. राज्यपाल तर ‘काँग्रेसच्या पिंजऱ्यातील पोपट’ असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी ते सीबीआयला कसे देणार, असा सवालही त्यांनी केला.
आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्या सरकारच्या कृतीबाबत मुंडे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. न्यायमूर्तीनी केलेल्या चौकशीत ठपका ठेवूनही कोणीही दोषी नाही, अशी भूमिका घेऊन सरकार व मुख्यमंत्र्यांनी कळसच केला आहे. त्यामुळे केवळ आदर्शच नाही, तर वीज आणि जलसंपदा विभागातील गैरव्यवहारांचीही युती सत्तेवर आल्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.