17 December 2017

News Flash

दोषी रेल्वे अधिकऱ्यांवर कारवाई ?

महामेगाब्लॉकमुळे गेलेले पाच प्रवाशांचे बळी आणि गेल्या आठ दिवसांपासून चाललेले ‘मेगाहाल’ यामुळे रेल्वेप्रवाशांत असलेल्या

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 5, 2013 5:18 AM

महामेगाब्लॉकमुळे गेलेले पाच प्रवाशांचे बळी आणि गेल्या आठ दिवसांपासून चाललेले ‘मेगाहाल’ यामुळे रेल्वेप्रवाशांत असलेल्या तीव्र संतापाच्या झळा मुंबईतील लोकप्रतिनिधींना जाणवत नसल्या, तरी आता त्या रेल्वे बोर्डापर्यंत पोचल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या गोंधळाची कारणे शोधण्यासाठी आज, शनिवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल मुंबईत येत आहेत. दरम्यान, पुन्हा लवकरच ठाणे ते कळवा आणि कळवा आणि दिवा या स्थानकांदरम्यान दोन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या गोंधळाचे पर्व एवढय़ात संपेल अशी चिन्हे नाहीत. त्यानंतर मात्र ठाण्याच्या पुढील प्रवाशांना अधिक वेगाने आणि सुखकर प्रवास करता येईल.
मध्य रेल्वेवर आठ दिवसांहून जास्त काळ सुरू राहिलेला गोंधळ नेमका कशामुळे झाला, नेमक्या त्रुटी काय राहिल्या, याची चौकशी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष मित्तल करणार असून, दोषी रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत विभागाकडून अत्यंत ढिसाळ पद्धतीने आणि कूर्मगतीमुळे महामेगाब्लॉकच्या दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये काम पूर्ण झाले नाही. परिणामी विद्युत विभागाकडून याबाबत खुलासा मागविण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे गाडय़ांना झालेल्या गर्दीने घेतलेल्या बळींचे नातेवाईकही शनिवारी दुपारी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना भेटून नुकसानभरपाईची मागणी करणार असल्याचे सांगण्यात येते.
ठाण्यापुढील प्रवाशांना लाभ
ठाणे येथे झालेल्या महामेगाब्लॉकचा लाभ ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर ठाण्याच्या पुढे पूर्णपणे २५ हजार व्होल्टवर चालणाऱ्या गाडय़ा धावतील. या सर्व गाडय़ा आधुनिक असतील. त्याचप्रमाणे ठाणे येथे झालेल्या स्थानकातील बदलामुळे १५ फेब्रुवारीपासून ठाणे ते कर्जत-कसारा शटल गाडय़ा सुटतील. त्याचप्रमाणे यार्डाच्या विस्तारीकरणामुळे नवे सिग्नल्स लावल्यामुळे धीम्या मार्गावरील गाडय़ा स्थानकात शिरताना अधिक वेगाने येतील आणि त्यांचा मार्गातील थांबण्याचा वेळ कमी होईल. ३१ मार्चपर्यंत ठाणे स्थानकातील पाचवा-सहावा फलाटाचा विस्तार झाल्यावर लांबपल्ल्याच्या गाडय़ा दोन ऐवजी एकदाच उभ्या राहतील आणि त्याचाही वेळ पाच मिनिटांनी कमी होणार आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग (पारसिक बोगद्याच्या बाहेरून) उभारण्याचे काम सध्या सुरू असून ते मार्ग धीम्या मार्गाला जोडण्यासाठी लवकरच पुन्हा महामेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधींनी माफी मागितली
ठाणे येथे झालेल्या महामेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे सतत सात दिवस हाल होत असताना बेपत्ता झालेल्या लोकप्रतिनिधींना आता जाग आली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात गुरुवारी, तर आनंद परांजपे आणि डॉ. संजीव नाईक यांनी शुक्रवारी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची भेट घेतली. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, जखमींना उपचाराचा सर्व खर्च मिळावा आणि त्यांनाही सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशा मागण्या या लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. तर कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी या आणीबाणीच्या काळात येथे नसल्याबद्दल जनतेची माफी मागितली आहे. ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक यांनी आमच्यामुळेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष मुंबई दौऱ्यावर येत आहेत, असे जाहीर केले आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनो, सावधान!
माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारच्या रात्री जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. शनिवार, ५ जानेवारीच्या रात्री ११.५५ ते रविवार, ६ जानेवारीच्या पहाटे ३.५५ वाजेपर्यंत जलद मार्गावर तसेच पाचव्या मार्गावर हा ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे.

First Published on January 5, 2013 5:18 am

Web Title: action against culprits officers