मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पालिके ने धडक कारवाई सुरू के ली असून बुधवारी बोरिवलीतील बांधकाम सुरू असलेल्या भूखंडावरील मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी कार्यालय अटकावणी (सील) सह बांधकामासाठी वापरले जाणारे मिक्सर जप्त करण्यात आले. तर वर्सोवा, अंधेरी, मालाड, गोवंडी, माटुंगा, येथील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जलजोडणी खंडित केली, काही ठिकाणी विविधस्तरीय कारवाई करण्यात आली.

थकीत कर वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून त्यानंतरच्या टप्प्यात नोटीस देण्यात येत आहे. मात्र, जे मालमत्ता धारक वारंवार विनंती करून व नोटीस पाठवूनही मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्या मालमत्तेची  जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने – वातानुकूलन यंत्रणा अशा महागडय़ा वस्तू जप्त करणे यांसारखी कारवाई करण्यात येत आहे. विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास  थकीत रकमेवर दंड आकारणीही करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये पाच हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य असून चार हजार १०० कोटी इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यात ११०० कोटींची तूट असून आठ दिवसांत उर्वरित वसुली करावी लागणार आहे.

बुधवारी करण्यात आलेली कारवाई

  • वर्सोवा परिसरात असणाऱ्या मा. म. स. गृहरचना सोसायटी या निवासी इमारतीवर ८७ लाख २४ हजार ४५२ रुपये इतकी मालमत्ता कराची थकबाकी होती. इमारतीच्या चार जलजोडण्या खंडित केल्या.
  • अंधेरीतील एका मालमत्तेची ९७ लाख ३८ हजार ४२० रुपये इतकी थकबाकी होती. या ठिकाणची जलजोडणी खंडित केली आहे.
  •  मालाड पश्चिम परिसरातील राइट चॅनल कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या अखत्यारीतील एका मालमत्तेवर रुपये दोन कोटी ६५ लाख १० हजार ४०० एवढी थकबाकी होती. या मालमत्तेची जलजोडणी खंडित केली आहे.
  • माटुंगा परिसरातील के नप्पू इमारत या निवासी इमारतीवर एक कोटी ३९ लाख थकबाकी होती. त्यांची जलजोडणी खंडित केली.
  • गोवंडीतील एका मालमत्तेवर थकबाकी होती. संबंधितांच्या वाहनांना जॅमर बसविले. या कारवाईनंतर संबंधितांनी २९ लाख रुपये पालिकेत जमा के ले.
  • टाटा नगर परिसरातील मे. हैदर अली टिंबर मार्ट  यांच्या मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली.
  •  मे. आशापुरा ऑप्शन प्रा.लि.च्या बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर ३.७३ कोटींची थकबाकी होती. भूखंडावरील साइट ऑफिस व काँक्रीट मिक्सर जप्त करून सील करण्यात आले.
  •  बोरिवली पूर्व – मे. एलिट कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बांधकाम सुरू असलेल्या एका भूखंडावर १५.१८ लाख रुपये इतकी थकबाकी होती. भूखंडावरील कार्यालय सील करून एक मिक्सर मशीन जप्त आली आहे.