दोन महिन्यांत २० हजार रेल्वे प्रवाशांवर कारवाई; ३६ लाखांचा दंड वसूल

मुंबई : मुखपट्टीशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकात नियुक्त मार्शलकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून फेब्रुवारी व मार्चमध्ये एकू ण २० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या बेफिकीर प्रवाशांकडून तब्बल ३६ लाख रुपये दंड रूपात वसूल करण्यात आले. मात्र असे असले तरीही मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना असतानाही अनेक प्रवासी मुखपट्टीशिवाय लोकल प्रवास करीत आहेत. काही जण मुखपट्टी हनुवटीवर ठेऊन प्रवास करताना दिसतात, तर काही प्रवाशांची मुखपट्टी खिशात वा हातात दिसते. त्यामुळे अन्य प्रवाशांना करोना संसर्गाचा धोका निर्माण होतो. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेने रेल्वेच्या मदतीसाठी स्थानकात मार्शल नियुक्त केले आहेत. या कारवाईची तीव्रता वाढविण्यासाठी मार्शलची संख्या वाढविण्यात आली आहे. मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

फेब्रुवारी २०२१ पासून सामान्य प्रवाशांनाही ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देतानाच मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. मध्य रेल्वेवर १० हजार आणि पश्चिम रेल्वेवर १० हजार २२२ प्रवासी मुखपट्टीशिवाय प्रवास करताना आढळले. पश्चिम रेल्वेवर फे ब्रुवारीत यापैकी चार हजार ०१७ प्रवासी मुखपट्टीशिवाय फिरताना आढळले. मार्चमध्ये मुखपट्टीविना फिरणाऱ्या सहा हजार २०४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वेवरही फेब्रुवारीत चार हजार ८००, तर मार्चमध्ये पाच हजार २०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाई सुरू असली तरीही मुखपट्टीविना फिरणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाई तीव्र करण्याच्या सूचना के लेल्या आहेत. तसेच कारवाईसाठी मार्शलची संख्याही हळूहळू वाढवली जात आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नाही.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

मुंबई पालिकेच्या मार्शलमार्फत रेल्वे स्थानकात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई तीव्र के ली आहे. प्रवाशांनी मुखपट्टीचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा सूचनाही रेल्वेकडून वारंवार के ल्या जात आहेत. तरीही काही प्रवासी त्याचे पालन करताना दिसत नाहीत.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे