पालिकेकडून दोन गाळे जमीनदोस्त

सिद्धीसाई इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरील अल्ताफ नगरमध्ये एका खासगी जागेवर बांधलेले दोन व्यावसायिक गाळे पाडण्यात आले. या गाळ्याचे वीजमीटर सुनील शितपच्या नावावर होते.

गोळीबार रोडवरील या जागेवर महानगरपालिकेने सात वर्षांपूर्वी, २०१० मध्ये कारवाई केली होती. मात्र या जागेची मालकी असल्याचे सांगत गणेश कल्लू नामक व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने पालिकेने कारवाई थांबवली होती. मात्र गेल्याच महिन्यात न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. त्यानंतर शुक्रवारी पालिकेच्या एन विभागाकडून कारवाई करत अनधिकृतपणे चालवले जाणारे व्यावसायिक गाळे दुसऱ्यांदा तोडले. २० बाय ६० फूट जागेवरील या गाळ्यात कॅटरिंग व्यवसाय चालवण्यात येत होता.

अनधिकृत गाळ्यांसाठी घेतलेले वीजमीटर सुनील शितप याच्या नावावर होते. या कारवाईसाठी महापालिकेचे १५ कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. मुंबई पोलीस दलाचे १७ पोलीस कर्मचारीदेखील या ठिकाणी तैनात होते. यानंतर सुनील शितप याच्या इतर ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई होण्याची शक्यता पालिका वर्तुळात वर्तवली गेली.