सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार, फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बऱ्याच वर्षांनी अभिनेता सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली होती.

विद्या यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांचं पहिलं लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत झालं होतं. मात्र, दुसऱ्या पतीविरोधात त्यांनी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी घटस्फोट घेतला.