अधिकाऱ्यांना एक टप्पा बढतीची संधी

मधु कांबळे, मुंबई</strong>

मंत्रालयात सचिवांच्या खालोखाल आणखी काही अतिरिक्त सचिवपदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंत्रालय संवर्गातील अधिकाऱ्यांना आणखी एक टप्पा बढतीची संधी मिळणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे.

राज्य शासनाच्या प्रशासन रचनेत मंत्रालय हा स्वतंत्र संवर्ग आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अधिकाऱ्याला पुढे सहसचिव पदापर्यंत बढतीची संधी मिळते. परंतु त्यापुढे पदच नसल्याने अनेक वर्षे त्याच पदावर काम करुन त्यांना निवृत्त व्हावे लागते. त्यामुळे मंत्रालयातील अधिकारी वर्गामध्ये काहीशी नाराजी आहे.

महसूल संवर्गातील अधिकाऱ्यांना जास्त बढतीची व वेगवेगळ्या विभागात महत्त्वाच्या पदांवर प्रतिनियुक्तीची संधी मिळते. लोकसेवा आयोगाची कठिण परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापर्यंत बढतीची संधी मिळते. राज्य सरकारचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना मात्र त्या तुलनेत बढत्यांची संधी कमी मिळते, असा नाराजीचा सूर आहे.

मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा कक्ष अधिकाऱ्याला पुढे अवर सचिव, उपसचिव व सहसचिव पदापर्यंत पदोन्नती मिळते. त्यापुढे बढतीचे पदच नाही. त्यामुळे सहसचिव म्हणून एकाच पदावर दहा-बारा वर्षे काम करुन निवृत्त व्हावे लागते. त्याचा परिणाम खालच्या पदांवरील अधिकाऱ्यांवरही होतो. सहसचिवपदापुढे बढती नसल्याने आणि ती पदे आठ-दहा वर्षे रिक्त होणार नसल्याने कक्ष अधिकारी, अव्वर सचिव, उपसचिव यांना बढती संधी मिळत नाही. ही कोंडी फुटावी, यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने मंत्रालयात सहसचिवपदानंतर अतिरिक्त सचिव पद निर्माण करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यास हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.

* मंत्रालयात ७४५ कक्ष अधिकारी, २६४ अव्वर सचिव, १०५ उपसचिव आणि ५२ सहसचिव अशी मंजूर पदे आहेत.

* मंत्रालयातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी महासंघाच्या मागणीला राज्य सरकारकडून अनुकूलता दर्शविण्यात आली आहे.

* त्यानुसार मंत्रालयात १५ ते २० अतिरिक्त सचिव ही नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत, असे समजते. त्यासंबंधीचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे.