अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचे गूढ तिच्या मृत्यूला वर्ष उलटले तरी उलगडलेले नाही. एकीकडे तिची आई मुलीची हत्या झाल्याचा आरोप करीत न्यायालयीन लढा देत असताना दुसरीकडे जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला तिचा मित्र सूरज पांचोली याचे कुटुंबीयसुद्धा न्यायालयीन लढाईच्या पवित्र्यात आहे. जियाच्या आईने आपल्या कुटुंबियांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत सूरजचे वडील अभिनेता आदित्य पांचोली याने तिच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आणि पोलीस आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तिची आई राबिया खान यांनी केला असून तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयानेही दोन दिवसांपूर्वीच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.
दरम्यान, जियाच्या आईने आपल्या कुटुंबियांची बदनामी करणारा मजकूर सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रसिद्ध केल्याचा दावा करीत आदित्य पांचोली आणि झरीना वहाब यांनी जियाच्या आईविरुद्ध १०० कोटी रुपयांचा दावा केला आहे. जियाच्या आईने प्रसिद्ध केलेल्या मजकूरामुळे समाजात आपली प्रतिमा मलीन झाल्याचा आरोपही पांचोली याने दाव्यात केला आहे. त्यावर ९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.