मुंबई काँग्रेसमधील वाढत्या लाथाळ्यांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीनंतर तरी काही उपयोग होईल का, याबाबत पक्षातच साशंकता आहे. वीज दरवाढीच्या विरोधात राहुल यांना रस्त्यावर उतरविण्याच्या निर्णयावरूनही पक्षात दोन मतप्रवाह आहेत.

‘काँग्रेस संदेश’ या पक्षाच्या मुखपत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. आमदार भाई जगताप यांचा सत्कार आणि राहुल यांच्या दौऱ्याच्या तयारीकरिता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पक्षांतर्गत गटबादीचे पडसाद उमटले. अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत आणि निरुपम यांचे समर्थक परस्परांना भिडले.

निरुपम यांच्या नोटिसीवरूनही चर्चा

काँग्रेस संदेश या मुखपत्रात नेत्यांची निंदानालस्ती करण्यात आल्याबद्दल पक्षाने निरुपम यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दोन दिवस आधी ही नोटीस बजाविण्यात आल्याने पक्षात त्याची वेगळी चर्चा आहे. निरुपम यांना नोटीस बजावून पक्षाने कामत, देवरा गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्यौ दौऱ्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांना हटविण्यात आले होते याकडे निरुपम विरोधक लक्ष वेधत आहेत. निरुपम विरुद्ध कामत गटात कमालीचे ताणले गेल्याने राहुल गांधी यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यात फारसा फरक पडणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

वीज दरवाढ आणि राहुल गांधी यांची पदयात्रा

मुंबई खासगी कंपनीकडून वीज ग्राहकांची लूट करण्यात येते ही वस्तुस्थिती असली तरी काँग्रेसची सत्ता असताना याबद्दल काहीच प्रयत्न झाले नव्हते. तेव्हाही बरीच ओरड झाली होती. या मुद्दय़ावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून पदयात्रा काढणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे.