तेल, रासायनिक कंपन्यांतील प्रदूषणाचा रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम; दुर्घटनांचीही टांगती तलवार

मुंबई शहरातील सर्वाधिक प्रदूषित परिसर म्हणून ओळख असलेल्या चेंबूरमधील तेल व रासायनिक कंपन्यांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत सातत्याने ओरड सुरूच आहे. ‘बीपीसीएल’च्या प्रकल्पाला बुधवारी लागलेल्या आगीनंतर या स्थानिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासल्याच्या तक्रारी असतानाच, आगीसारखी दुर्घटना याठिकाणी मोठी जीवितहानी घडवू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

चेंबूरच्या या माहुल गाव परिसराला लागून असलेल्या नऊशे एकर जागेत भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आरसीएफ, ओएनजीसी, टाटा पॉवर, एजीस गॅस आणि इतर अनेक खासगी कंपन्यादेखील आहेत. या कंपन्यांमधून हवेत  मोठय़ा प्रमाणात विषारी धूर सोडला जातो. तर या कंपन्यांलगत असलेल्या माहुल समुद्रात विविध प्रकारची टाकाऊ रसायने सोडली जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत माहुलगाव, गव्हाण गाव, गडकरी खाण, माहुल एमएमआरडीए वसाहत आणि परिसरातील लोकवस्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात  विविध रोग पसरले आहेत. या परिसरात दमा आणि कर्करोगाचा प्रार्दुभाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. शिवाय त्वचा रोग, हाडांचा रोग आणि फुफ्फुसांचा रोग अशा अनेक आजारांनी येथील रहिवाशांना वेढले आहे. त्यातच या ठिकाणी महिलांमध्ये गर्भपात होण्याचे प्रमाणदेखील मोठे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

१० ते १२ वर्षांपूर्वी एमएमआरडीएने याच कंपन्यांना लागून असलेल्या एका मोकळया भूखंडावर  ४६ इमारती बांधल्या असून यामध्ये १२ हजार ७१४ घरे आहेत. ही सर्व घरे एमएमआरडीने पालिकेच्या ताब्यात दिली असून सध्या या सर्व घरांचा ताबा हा पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाकडे आहे. यामध्ये पालिकेने शहरातील रस्ते, नाले, पाइपलाइन आणि विविध प्रकल्पांमध्ये बाधित असलेल्या सात हजार कुटुबीयांना याठिकाणी जबरदस्ती घरे दिली आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषण असल्याने या रहिवाशांनी या घरांमध्ये राहण्यास नकार दिला. मात्र दुसरा पर्याय नसल्याचे कारण सांगत पालिकेने आम्हाला या ठिकाणी डांबून ठेवल्याचा आरोप जयश्री भोईटे या महिलेने केला आहे.

बीपीसीएल कंपनीपासून पालिकेची ही वसाहत अवघ्या शंभर मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या स्फोटाने सर्वाधिक हादरा याच इमारतींना बसला. यामध्ये अनेक घरांमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून स्फोटानंतर सर्वच रहिवाशांनी भीतीने घराबाहेर पळ काढला होता. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, त्याठिकाणीच तेल साठवण्याच्या अनेक टाक्यादेखील आहेत. या टाक्यांमध्ये लाखो लिटर तेल साठा आहे. त्यामुळे जर ही आग वाढलीच असतीच तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे भीतीने अनेक रहिवाशी घराला कुलूप लावून घराबाहेर पडले होते. तर काही रहिवाशांनी याच वेळी पालिकेविरोधात मोर्चा काढत दुसरीकडे स्थलांतर करण्याची मागणी  केली.