ढगाळ वातावरण आणि  वाऱ्याचा जोर नसल्याने गेल्या आठवडय़ाभरापासून शहरातील  हवेची खालावलेली प्रत रविवारी सुधारली. हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने शनिवारी हवेची गुणवत्ता १७५ निर्देशांक म्हणजे ‘समाधानकारक’ स्तरापर्यंत नोंदविण्यात आली होती. रविवारी या  आणखी सुधारणा होऊन सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेतील प्रदूषणाचे प्रमाण १०० एककाहून खाली आले.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्चकडून (सफर) शहरातील हवेची प्रत मोजली जाते. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले होते व  हवेतील सुक्ष्म धूलिकण हवेच्या खालच्या थरातच अडकून बसले होते. त्यामुळे मंगळवारी हवेतील प्रदूषणाचा निर्देशांक (एक्यूआय) २७१ आणि बुधवारी २७५ वर पोहोचला होता. दोनशेहून अधिक निर्देशांक हा हवेची प्रत वाईट असल्याचा निदर्शक आहे. आठवडय़ाभरात हवा पुन्हा कोरडी होऊन हवेची गुणवत्ता सुधारणार असल्याची माहिती ‘सफर’च्या संचालकांनी दिली होती. हा अंदाज खरा ठरला असून मुंबईकरांना प्रदुषणमुक्त हवेत श्वास घेणे शक्य झाले आहे.

हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता कमी होते. हवा दूषित करण्याची क्षमता अधिक असणारे ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ हे कण जमिनीलगतच्या हवेत अडकतात. त्यामुळे  हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक उच्चांक पातळी गाठत होता.

या वर्षांतील सर्वाधिक ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेची नोंद बुधवारी करण्यात आली होती. दिवाळीनंतर प्रथमच मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची प्रत मोठय़ा प्रमाणात ढासळली होती. मात्र आठवडय़ाभरात हवेच्या सर्वसाधारण दर्जामध्ये सुधारणा होणार असल्याची माहिती ‘सफर’चे संचालक डॉ. गुफरान बेग यांनी ‘लोकसत्ता’ला दिली होती. शुक्रवारपासून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास सुरूवात झाली.