News Flash

हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरावर

हरित लवाद आणि पालिकेच्या निर्बंधांमुळे प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई महापालिकेने फटाक्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबईमध्ये शनिवारी बहुतांश ठिकाणी दिवसभर हवा आणि ध्वनिप्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात राहिले. आवाजी फटाके वाजविण्यावर संपूर्ण निर्बंध असतानादेखील अनेक ठिकाणी रात्री ८ नंतर आवाजी फटाके वाजलेच.

शनिवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरावर होता. सर्वसाधारणपणे दिवसभर हीच परिस्थिती कायम होती. लक्ष्मीपूजनाला सायंकाळी फुलबाजी आणि अनार यांसारख्या फटाक्यांना महापालिकेने परवानगी दिलेली असल्याने काही ठिकाणी रात्री आठनंतर अशा फटाक्यांबरोबरच आवाजी फटाकेदेखील वापरण्यात आले. मुंबईत काही भागांतून नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आवाजी फटाके  फोडू नका, असे आवाहन पोलीस करीत होते.

शनिवारी सकाळी चेंबूर आणि वांद्रे कुर्ला संकुल परिसर वगळता सर्व ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला. पीएम २.५ या घातक घटकाचे प्रमाणदेखील समाधानकारक होते. चेंबूर आणि वांद्रे कुर्ला संकुल परिसरात मात्र हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट आणि अति वाईट स्तरावर नोंदविण्यात आला.

शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी फटाक्यांचे प्रमाण मर्यादित स्वरूपात आढळून आले. फटाके फोडले गेले, मात्र दरवर्षी दिवाळीत होणारा त्रास तुलनेने कमी दिसून आला. आवाजी फटाके फोडण्यावर संपूर्ण निर्बंध पालिका आणि राष्ट्रीय हरित लवादाने घातले होते. तरीदेखील अनेक ठिकाणी आवाजी फटाके फोडण्यात आले.

सर्वसाधारणपणे वांद्रे कुर्ला संकुल, चेंबूर, माझगाव या ठिकाणी अनेकदा हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर असतो. मात्र शनिवारी संपूर्ण शहरभर हे प्रमाण मध्यम स्तरावर होते. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार पवई आणि बोरिवली येथे हे प्रमाण रात्री ९ वाजतादेखील समाधानकारक स्तरावर दिसून आले.

ध्वनिप्रदूषण मोजण्यात अडचण.. आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलअली यांनी रात्री ८ ते १० दरम्यान शहर आणि उपनगरांत ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्याचा प्रयत्न केला. फटाके फोडण्याचे प्रमाण विखुरलेले असल्याने त्यांना ध्वनिप्रदूषण पातळी मोजण्यात अडचणी आल्या. मात्र लांबवरून फटाके फोडल्याचे आवाज सतत येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शक्यता काय?

सफरच्या (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) नोंदीनुसार शनिवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरावर असला तरी रविवारी अनेक ठिकाणी तो वाईट स्तरावर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांत थंडी असल्याने कोरडे वारे वाहत आहेत. वाऱ्यांची गतीदेखील कमी आहे. परिणामी जमिनीलगतचे प्रदूषक घटक हवेत विरून जात नसल्याने हवा प्रदूषणाचे प्रमाण रविवारी वाढू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:20 am

Web Title: air quality index at moderate level abn 97
Next Stories
1 धर्मस्थळांत उद्यापासून प्रवेश
2 करोना लशीच्या प्राधान्य यादीपासून अंगणवाडी सेविका दूरच
3 १३८ कोटींची पाणीपट्टी थकबाकी वसूल
Just Now!
X