अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. कर्जमाफीचा कालावधी वाढवतानाच सरकारने कृषी मूल्य आयोगात शेतकरी संघटनांच्या दोन प्रतिनिधींना स्थान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास मुंबईतील अाझाद मैदानात दाखल झाला. सर्व शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा, या आणि अन्य मागण्यांसाठी शेतकरी आझाद मैदानात पोहोचले. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. अत्यंत शिस्तबद्ध मोर्चामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. सरकारच्या वतीने गिरीष महाजन यांनी देखील शेतकऱ्यांचे आभार मानले. ‘मी अनेक आंदोलन बघितली. पण हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध होते’, असे त्यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील शिस्तबद्ध मोर्चासाठी शेतकऱ्यांचे आभार मानले.  शिस्तबद्धपद्धतीने निघालेल्या या मोर्चाने आम्हापा खूप काही शिकवलं, असे महाजन यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी शेतकऱ्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ मंत्रिगटाची भेट घेण्यासाठी गेले. जवळपास तीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने आझाद मैदानात जाऊन शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या आश्वासनांची माहिती दिली.  बोंडअळी व गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल, राज्य कृषीमूल्य आयोगावर किसान सभेचे दोन सदस्य नेमणार, दुधाचे दर ठरवण्यासाठी वेगळी बैठक घेणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार असल्याचे आश्वासन सरकारने दिल्याची माहिती अशोक ढवळे यांनी दिली. दोन महिन्यात या मागणीवर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.  ३० जून २०१७ पर्यंतचे कर्ज माफ होणार असून कर्जमाफीसाठी कुटुंबातील सदस्यांची अट रद्द होणार असल्याची माहिती अजित नवले यांनी दिली. सहा महिन्यांच्या आत वनजमिनीच्या हक्काचे दावे निकाली काढले जातील, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.

Updates:

– शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ- मंत्रिगटाची बैठक संपली

– आदिवासी भागातील रेशन कार्डाची तीन महिन्यात होणार दुरुस्ती

– वन जमिनीबाबत येत्या सहा महिन्यात घेणार निर्णय

– वन हक्क कायद्याचे दावे सहा महिन्यात संपवणार

-जीर्ण रेशन कार्ड सहा महिन्यात बदलून देणार

– संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थीचे मानधन सकारात्मक निर्णय घेऊ

– शेतकऱ्यांच्या ८० टक्क्याहून जास्त मागण्या मान्य – गिरीश महाजन

– 46 लाख लोकांना लाभ दिला, राहिलेल्या लोकांना लाभ दिला जाईल – मुख्यमंत्री

– शेतकरी आंदोलन संपण्याची शक्यता

– शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचाही पाठिंबा

– शेतकरी नेते बैठकीसाठी विधानभवनात दाखल

– थोड्याच वेळात १२ जणांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

– सरकारने चालबाजी केल्यास अन्नत्याग करू, आंदोलकांचा इशारा

– आझाद मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती

– मागण्या मान्य केल्या नाही तर उद्यापासून इथेच उपोषणाला बसणार- आमदार जीवा गावित

– दुपारी १२.१५ वाजता शिष्टमंडळ बैठकीसाठी निघणार

– सरकारला आपलं म्हणणं मान्य करायला भाग पाडायचं- आमदार जीवा गावित

– मुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय मंत्री समितीची बैठक सुरू, बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा

– मुंबई महापालिकेकडून अाझाद मैदानावर टँकरने पाण्याची सुविधा

– मुंबईतील डॉक्टरांकडून आजारी शेतकऱ्यांसाठी उपचाराची सोय

– आझाद मैदानावर शिवसेना, काही मुस्लीम संघटना, शीख संघटनांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाण्याची व अल्पोपहाराची सोय.

–  आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.

–  शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी तयार : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

– आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत उठणार नाही – आंदोलक शेतकरी

– दुपारी बारा वाजता सरकारचे प्रतिनिधी घेणार शेतकऱ्यांची भेट

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची समिती नियुक्त. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

– दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलक शेतकऱ्यांनी रात्रीच आझाद मैदानाकडे प्रस्थान ठेवले.

– रात्रीच सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शीख समाजाने विशेष लंगरचे आयोजन केले होते तर अनेक ठिकाणी मुस्लीम बांधव शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटचे पुडे घेऊन शेतकऱ्यांची वाट पाहत होते.