मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकावर सर्व महिला कर्मचारी

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानक हे संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक म्हणून समोर आल्यानंतर आता आणखी तीन स्थानकांवरही महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे. मध्य रेल्वेवरील दोन आणि पश्चिम रेल्वेकडून एका स्थानकाचा यात समावेश आहे. मध्य रेल्वेकडून दोन स्थानकांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आले नसून पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड स्थानकाचा त्यासाठी विचार केला जात आहे.

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानक हे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले. या स्थानकावर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार जुलै २०१७ पासून माटुंगा स्थानक महिला कर्मचाऱ्यांचे स्थानक म्हणून ओळखले जावू लागले. ४१ महिला कर्मचारी असलेल्या या स्थानकाची लिम्का बुक ऑफ रेर्कार्डमध्येही नोंद झाली आहे. महिला कर्मचाऱ्यांमध्ये तिकिट खिडक्यांवरील कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल, तिकिट तपासणी, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे. माटुंगा स्थानकाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हातात येताच या स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पादचारी पूल, महिलांचा डबा, दिव्यांगाचा डबा इत्यादी माहिती फलकाद्वारे दर्शविण्यासह अन्य सुविधा पुरविण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

माटुंगा स्थानकानंतर मध्य रेल्वेकडून संपूर्ण महिला कर्मचारी नियुक्तीसाठी आणखी दोन स्थानकांचा विचार केला जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गर्दीच्या स्थानकांवर ही नियुक्ती करणे योग्य ठरेल की कर्मी गर्दीच्या यावर विचारविनिमय सुरू आहे. नियुक्ती करताना महिला कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे का याचीही चाचपणी करत असल्याचे सांगितले. पश्चिम रेल्वेकडूनही सध्या माटुंगा रोड, वांद्रे आणि मरीन लाइन्स स्थानकासह आणखी एका स्थानकाचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. यातील माटुंगा स्थानकाचीच निवड करण्याचा विचार पश्चिम रेल्वेकडून केला जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागिय रेल्वे व्यवस्थापक एस.जैन यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकात संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने माटुंगा रोड स्थानकाचा विचार सुरू आहे. रेल्वे सुरक्षा दल, तिकिट तपासणीसह सर्व कर्मचारी या महिलाच असतील.

– मुकुल जैन, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे