मुंबई : ईव्हीएम विरोधात येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी वांद्रे येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

‘ईव्हीएम-व्हीहीपॉट हटाव, लोकशाही बचाव’ अशी भूमिका घेऊन मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आदी पक्षांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनीही ईव्हीएम प्रणालीस विरोध व्यक्त केला. अनेक प्रगत देशांतही मतपत्रिकेद्वारे मतदान होत असताना आपल्याकडेच ईव्हीएमचा अट्टहास कशाला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला, तर निकोप लोकशाहीसाठी ईव्हीएम विरोधात शिवसेना व भाजपनेही ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमान शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील, विद्या चव्हाण व ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. ईव्हीएमविरोधात राज्यातील सर्व पक्ष एकवटले असून या विषयावर आम्ही घरोघरी अर्ज वाटून लोकांची मते जाणून घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. लोकांच्या मतांचा अंदाज घेऊन येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत एक मोर्चा काढण्यात येणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे लोकांचा जो कौल अर्जाद्वारे गोळा केला जाईल तो देण्यात येणार असल्याचेही राज म्हणाले.

या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा अथवा चिन्ह नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका व जपानसारख्या अनेक प्रगत राष्ट्रांत ईव्हीएमद्वारे मतदान न घेता मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले जात असताना आपल्याकडेच ईव्हीएमचा अट्टहास कशासाठी, असा सवाल करत या प्रक्रियेवर आमचा विश्वास नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.