करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यात वेळ बराच गेला आहे. त्यामुळे करोना स्थितीचा आढावा घेऊन, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सामायिक म्हणजे एकाच वेळी परीक्षा घेता येतील का, याचा विचार करावा, अशा सूचना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी कुलगुरूंना केल्या.

करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे काय करायचे, याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दूरचित्रसंवादाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) विद्यापीठांच्या कुलगुरूंशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर करोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांचे नियोजन, नियंत्रण व नवे वेळापत्रक तयार करणे, यासाठी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली. ही समिती सर्व परिस्थितीचा अभ्यास करून विभागाला अहवाल सादर  करणार आहे.

विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या परीक्षा, तसेच विद्यापीठ स्तरावरील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांनीही मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दूरचित्रसंवाद साधला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, विद्यापीठांच्या स्थगित केलेल्या परीक्षा सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशा सूचना या वेळी त्यांनी केल्या.

विद्यापीठांची सामाजिक जबाबदारी

विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर करोना परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क व सेनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, असे राज्यपालांनी सांगितले. व्हर्च्युअल क्लास रूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे, तसेच प्रत्येक विद्यापीठाने आपापल्या परिसरामध्ये स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रित लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग शासनाला योगदान म्हणून देता येईल का, याचा विचार करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.