|| संतोष प्रधान

बसप वगळता अन्य पक्षांना तेवढा पाठिंबा नाही; जागा वाटपावरच बरेचसे गणित अवलंबून

भाजपचा पराभव करण्याकरिता राज्यात समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला असला तरी बसपावगळता अन्य छोटय़ा पक्षांची ताकद राज्यात फारच नगण्य आहे. मतांचे होणारे विभाजन टाळण्याकरिता सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची योजना असली तरी सारे पक्ष त्याला कसे प्रतिसाद देतात व जागावाटप हे सारेच कळीचे मुद्दे असतील.

उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र आल्याने गोरखपूर, फुलपूर आणि कैराना लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांतील चित्र बदलले. सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. त्यातून सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची कल्पना पुढे आली. महाराष्ट्रातही हा प्रयोग करण्याची सूचना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत महाआघाडी स्थापन करण्याकरिता छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती आदी विविध पक्षांना बरोबर घेण्याची योजना आहे.

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चार मुख्य पक्ष आहेत. याशिवाय मनसेची मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पट्टय़ात बऱ्यापैकी ताकद आहे. हे पाच पक्ष वगळता अन्य छोटय़ा पक्षांची काही विभाग वा ताकद आहे. या राजकीय पक्षांना बरोबर घेतल्यास मतविभाजन टाळता येऊ शकते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास भाजप (२७.८ टक्के), शिवसेना (१९.३ टक्के), काँग्रेस (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. या व्यतिरिक्त मनसेला ३.७ टक्के मते मिळाली होती. यानंतर बसपाला २.३ टक्के मते पडली होती.

अन्य राजकीय पक्षांना एक टक्के किंवा त्यापेक्षा कमीच मते पडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला ०.९ टक्के मिळाली होती. शेकापच्या पारडय़ात एक टक्का मते पडली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची अकोला, वाशीम जिल्’ाांमध्ये चांगली ताकद आहे.

राज्यातील छोटय़ा पक्षांच्या गेल्या दोन-तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास मतांमध्ये फार काही फरक पडलेला नाही. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घटली. बहुजन समाज पक्षाला २००४ मध्ये (४ टक्के), २००९ मध्ये (२.३५ टक्के) तर २०१४ मध्ये (२.३ टक्के) मते मिळाली आहेत. बसपाला मानणारा एक वर्ग राज्यात आहे.

बसपाची ताकद लक्षात घेता बसपाला आघाडीत सहभागी करून घ्यावे, अशी भूमिका विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी मांडली होती. प्रकाश आंबेडकर यांनीही बरोबर यावे, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. पण आंबेडकर राजी होण्याबाबत साशंकता आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. शेट्टी यांचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात चांगली ताकद असल्याने त्यांनी आघाडीत यावे, असा काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. डाव्या पक्षांची विशिष्ट विभागांमध्ये ताकद आहे. त्याचाही फायदा करून घेण्याचा प्रयत्न आहे.

जागावाटप किचकट

छोटय़ा पक्षांची ताकद मर्यादित असली तरी या मतांचे होणारे विभाजन सत्ताधारी भाजपला फायदेशीरच ठरते. बसपाच्या काही उमेदवारांना मिळणारी मते ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवाला मदत करतात, असे काँग्रेस नेत्यांचे निरीक्षण आहे. या मतांचे विभाजन टाळले तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चित्र काही प्रमाणात बदलण्यास मदतच होईल, असे नेतेमंडळींचे म्हणणे आहे. सारे छोटे पक्ष एकत्र आल्यास लोकसभेत नसले तरी विधानसभेत जागावाटप ही किचकट प्रक्रिया असेल, हे दोन्ही काँग्रेसचे नेते मान्य करतात. कारण प्रत्येक राजकीय पक्षाची जागांची अपेक्षा वाढेल याची जाणीव असल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. बसपाकडून जास्त जागांची मागणी पुढे येऊ शकते.

मतांचे विभाजन टाळण्यासाठीच छोटय़ा पक्षांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. महाआघाडीत सारे समविचारी पक्ष सहभागी झाल्यास चित्र नक्कीच बदलेल.   – खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.

महाआघाडीचा प्रयोग झाल्यास त्यातून आपापसात होणारे मतांचे विभाजन टाळू शकेल. हे विभाजन टाळण्याकरिताच सर्व पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेतले जाणार आहे.   – आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष.