‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचा ‘टीआरपी’ कृ त्रिमरीत्या वाढविण्यासाठी ग्राहकांना पैशांचे आमिष दाखविणाऱ्या एका आरोपीस शुक्र वारी गुन्हे शाखेने विरार येथून अटक केली.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, उमेश मिश्रा असे अटक आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च ग्रुपचा माजी कर्मचारी आहे. मिश्रा ग्राहकांना पैशांचे आमिष दाखवून दिवसातून ठरावीक तास रिपब्लिक वृत्तवाहिनी सुरू ठेवण्यास भाग पाडत होता. गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे आणि वांद्रे कक्षातील अधिकाऱ्यांनी विरार येथून मिश्राला अटक केली.

गुन्हे शाखेने उघड के लेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हा सहावा आरोपी आहे. याआधी फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचे मालक आणि हंसा कं पनीच्या माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

टीआरपी मोजण्यासाठी ‘ऑडियन्स ब्रॉडकास्ट रिसर्च सेंटर’ या संस्थेने काही ग्राहकांच्या घरी गुप्तपणे बॅरोमीटर यंत्रे बसवली आहेत. त्याद्वारे ग्राहक कोणती वाहिनी, कोणते कार्यक्रम जास्त पाहतो याची नोंद ठेवली जाते. या यंत्रांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी हंसा कंपनीची नेमणूक केली आहे. बॅरोमीटर बसविलेली घरे हंसा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठाऊक आहेत. कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी ही घरे हेरून ग्राहकांना पैशांचे आमिष दाखवले आणि ठरावीक वाहिन्या काही तासांसाठी सुरू ठेवण्यास भाग पाडले.

झाले काय? : गुन्हे शाखेने चार ग्राहकांचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेतला. यापैकी तीन ग्राहकांनी गुन्हे शाखेने नोंदवलेल्या जबाबात रिपब्लिक वाहिनीकडून पैशांचे आमिष दाखविण्यात आले, असा दावा केला होता. त्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर काय जबाब दिला हे मात्र सांगता येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, विशेष पथकाने बुधवार, गुरुवारी रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या दोन कार्यकारी संपादकांकडे चौकशी केली, त्यांचे जबाब नोंदवले. दोघांकडे काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली.