News Flash

शिवसेना-भाजपमध्ये खणाखणी!

शिवसेनेकडे एकहाती सत्ता असती तर भरघोस मदत देता आली असती, शिवसेनेची बांधीलकी सत्तेशी नाही, शेतकऱ्यांशी आहे

शिवसेनेने स्वाभिमान व बाणेदारपणा असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

मोदींच्या दौऱ्यावरील बहिष्कारामुळे तणाव; उद्धव यांचे सरकारवर तोंडसुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलल्याने शिवसेना-भाजप संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि ठाकरे बीड येथे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गेले. शिवसेनेकडे एकहाती सत्ता असती तर भरघोस मदत देता आली असती, शिवसेनेची बांधीलकी सत्तेशी नाही, शेतकऱ्यांशी आहे, असा जोरदार टोला लगावत ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेतले; तर पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेचा नामोल्लेखही न करता डॉ. आंबेडकरांचे विचार जपण्यासाठी केलेल्या सर्व बाबींचे सारे श्रेय भाजपचे असल्याचे सांगून शिवसेनेला किंमतही देत नसल्याचे दाखवून दिले.
दरम्यान, शिवसेनेने स्वाभिमान व बाणेदारपणा असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे. सत्तेत असूनही शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल, तर अपमान सहन करीत राहण्यापेक्षा सेनेने सत्तेवर लाथ मारावी, असेही ते म्हणाले. तर शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोडले आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असूनही मोदी यांनी आपल्या भाषणात रिपब्लिकन नेत्यांचा उल्लेख केला, पण शिवसेनेचे नावही घेतले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंबेडकर स्मारक व मेट्रो मार्गाचे भूमिपूजन आणि जाहीर सभेपासून ठाकरे यांना दूर ठेवण्याचा घाट भाजपने घातला होता. ठाकरे यांनी मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गेल्या काही काळात बरीच टीका केल्याने त्याचा वचपा काढण्याचा भाजपचा डाव होता. त्यामुळे ठाकरे आणि सेना नेते नाराज झाले. यासंदर्भात गदारोळ झाल्याने फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना ठाकरे यांना निमंत्रण देण्यास पाठविले. पण निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते आणि हा शासकीय कार्यक्रम असल्याने व ठाकरे हे आमदार-खासदार, मंत्री नसल्याने त्यांना शिष्टाचारानुसार कोठे बसवायचे हा प्रश्न होता. सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यास मुख्य व्यासपीठावर बसविता आले असते. पण तसे न झाल्याने केवळ उपस्थित राहण्यात स्वारस्य नसून त्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ठाकरे यांनी सुनावल्याचे समजते. तसेच सेनेचा टेकू सरकारला असल्याची जाणीव ठेवावी, असे शिवसेना नेत्यांनीही भाजपला ठणकावले आहे. त्यामुळे ही खणाखणी वाढण्याची चिन्हे आहेत.
– घोषणांचा पाऊस –

कसुरी विरोध मोडून काढणार

शिवसेनेने गुलाम अली आणि माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद मोहम्मद कसुरी यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना विरोध केला आहे. तो मोडून काढण्यासाठी फडणवीस यांनी सोमवारी कसुरी यांच्या कार्यक्रमासाठी मोठे पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. शिवसैनिकांनी गोंधळ घातल्यास पोलीस बळाचा वापर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी उद्धव यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, उद्धव यांनी कोणतेच आश्वासन दिले नाही.

भाजप आरक्षणविरोधी नाही – मोदी
केंद्रात किंवा विविध राज्यांमध्ये ज्या ज्या वेळी भाजपची सरकारे येतात, त्यावेळी आता दलित-आदिवासींचे आरक्षण रद्द होणार अशी हाकाटी पिटली जाते. विरोधक हा खोटा प्रचार मुद्दाम करतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. – सविस्तर पान २
मोदींसाठी टोलमुक्ती..
मोदी यांच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या सर्वच भागांतून भाजपचे कार्यकर्ते बस व मोटारी भरभरून मुंबईत पोहोचत असताना या सर्वानीच रविवारी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गासह महामार्गावरूनही टोलमुक्त प्रवास केला.
अंधेरी-दहिसर मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गाचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदास आठवले उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:45 am

Web Title: ambedkar memorial causes of cold war between sena bjp
Next Stories
1 आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विरोधकांचा खोटा प्रचार!
2 स्थानकांच्या विकासाचा मध्य रेल्वेचा इरादा! मुंबईतील सहा स्थानकांचा समावेश
3 सैन्याच्या सशस्त्र दलात आता महिलांनाही संधी
Just Now!
X