सागर नरेकर
अंबरनाथच्या जावसई भागातील डोंगरामध्ये एप्रिल महिन्यात एका तरुणाचे शिर धडापासून वेगळे केलेला मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी ‘थ्री डायमेंशन सुपर इंपोझिशन’ या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून मृताच्या चेहऱ्याचे चित्र तयार केले. त्यावरून मृताची ओळख तर पटलीच, पण त्याचे मारेकरीही पोलिसांच्या हाती लागले.
नऊ महिन्यांपूर्वीचा प्रसंग. अंबरनाथ पश्चिमेतील जावसई डोंगराचा परिसर. अनेक जण डोंगरावर फेरफटका मारण्यासाठी जातात. एक तरुण असाच डोंगरावर फेरफटका मारण्यासाठी गेला. त्या वेळेस डोंगरावर पडलेला मृतदेह पाहून त्याला घामच फुटला. मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. सुरुवातीला मृत व्यक्तीचे धडच आढळले, तर काही अंतरावर त्याचे शिर सापडले. मृतदेह काहीसा कुजू लागल्याने चेहरा विद्रूप झाला होता आणि दुर्गंधीही सुटली होती. पंचनामा करताना मृताची ओळख पटविण्यासंबंधीचा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही. चेहरा विद्रूप असल्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. अंबरनाथ किंवा आसपासच्या भागांतून तरुण बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती. त्यामुळे या गुन्ह्य़ाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे वाढले होते.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नरेंद्र पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्य़ाचा सविस्तर तपास सुरू केला. या तपासादरम्यान मृताची ओळख पटविण्यासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर हरीश पाठक यांची मदत घेतली. पाठक यांनी ‘थ्री डायमेंशन सुपर इम्पोझिशन’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मृतदेहाच्या शिराच्या आधारे त्याचा ढोबळ चेहरा तयार केला. गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यासाठी पहिल्यांदाच अशा तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. ढोबळ चेहऱ्याचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आणि त्याआधारे एका खबऱ्याने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. मृत व्यक्ती अंबरनाथच्या महेंद्रनगर भागातला बिन्द्रेश प्रजापती असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती.
मृतदेहाची ओळख पटली आणि तो एप्रिल महिन्यापासून बेपत्ता होता. तरीही त्याची पत्नी सावित्री हिने बिन्द्रेश हा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली नव्हती. बिन्द्रेश आणि सावित्री यांना दोन मुले आहेत. पती मृत असतानाही ती घरखर्च कसा भागवते आणि तिला कोणाचा आधार आहे, याबाबत पोलिसांनी माहिती काढण्यास सुरुवात केली. तिच्या घरी ये-जा करणाऱ्यांवरही पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये किसनकुमार कनोजिया हा तिच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यामुळे सावित्रीवर संशय बळावल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात तिने पती बिन्द्रेशच्या खुनाची कबुली दिली. सावित्री आणि किसनकुमार यांचे अनैतिक संबंध होते. त्यात बिन्द्रेश अडसर ठरत असल्याने दोघांनी राजेश यादवच्या मदतीने त्याला डोंगरावर दारू पिण्यासाठी नेले. तिथे दारूच्या नशेत असताना त्याची हत्या करण्यात आल्याची बाब तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांना तंत्रज्ञानाच्या मदतीने हा गुन्हा उघड करण्यात यश आले.