अपघातात पहिल्या दहा मिनिटांत रुग्णाला उपचार मिळाले तर रुग्णासाठी ते जीवनदायी ठरतात. तथापि मुंबईसारख्या महानगरात वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका वेळेवर अपघातस्थळी पोहोचणे हे कठीण असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने ब्रिटनच्या सहकार्याने ‘प्लॅटिनम दहा मिनिटां’चा विचार करून मोटरबाइक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम मुंबईत दहा ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, परिचारिका व डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम ब्रिटन सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी असलेल्या शहरांमध्ये अपघातानंतरची पहिली दहा मिनिटे रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन मोटरबाइक रुग्णवाहिका सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा सामंजस्य करार आरोग्यमंत्री डॉ. सावंत आणि ब्रिटनचे व्यापार व गुंतवणूकमंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, एनआरएचएमच्या आय. ए. कुंदन, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आदी या वेळी हजर होते. या सामंजस्य करारामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होणार असून ग्रामीण भागांतील रुग्णालये अद्ययावत होण्यासाठी इंग्लडचे सहकार्य मिळणार आहे. मोटरबाइक रुग्णवाहिका सेवा ही आगामी वर्षांपासून सुरू करण्यात येणार असून मुंबईतील या योजनेचा आढावा घेऊन राज्यातील अन्य शहरांमध्येही ही योजना राबविण्यात येईल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.