भारतीय प्रशासन व्यवस्था अत्यंत त्रासदायक असून वृद्धांचाही सन्मान येथील पोलिसांकडून राखला जात नाही, असे खडे बोल कुणा भारतीयाने नव्हे तर एका ९३ वर्षीय ए. व्हॅलेरी अमेरिकी पर्यटक महिलेने काढले आहेत. मुंबईतील मणीभवन येथे एका वाहतूक पोलिसाने केलेल्या अरेरावीनंतर या पर्यटक महिलेने या शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘अतुल्य भारत’च्या चकचकीत जाहिराती बघून भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचा मुंबईत येऊन भ्रमनिरास होताना दिसत असून परदेशी पर्यटकांना स्थानिक विक्रेते व नागरिकांच्या सोबतच आता वाहतूक पोलिसांच्या अरेरावीचाही जाच होत आहे.
ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक वर्षांतून एकदा मुंबईत येत असतात. अनेक पर्यटक मुंबई बंदरात मोठय़ा क्रूझ बोटींमधून येऊन शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देतात. या पर्यटकांना मुंबईतील पर्यटन स्थळांची ओळख करून देण्यासाठी संपूर्ण मुंबईत शासनमान्य ११० मार्गदर्शक आहेत. मात्र, याच शासनमान्य गाइडना व परदेशी पर्यटकांना स्थानिक व्यवस्थेच्या जाचाचा बळी होण्याची पाळी आली आहे. कारण, मणिभवन, इस्कॉन मंदिर, धोबी घाट या पर्यटन स्थळांवर वाहतूक पोलीस परदेशी पर्यटकांनी भरलेल्या बसच्या चालकांकडून वारंवार पैसे घेत असल्याचा आरोप हे मार्गदर्शक करत आहेत. या प्रकाराबाबत सांगताना शासनमान्य पर्यटन मार्गदर्शक नंदिनी जोशी म्हणाल्या की, मणिभवन हे गांधी संग्रहालय व गिरगावातील इस्कॉन मंदिर येथे पर्यटकांच्या बस उभ्या करण्यासाठी वाहनतळ नसल्याने येथे बस थांबवून पर्यटक उतरल्यावर बस तेथून निघून जाते. पर्यटक जमले की, बस पुन्हा येते. या वेळी तेथे असलेले वाहतूक पोलीस हुज्जत घालत बस चालकाकडून ५० रुपये घेऊन बस सोडतात. ही आमची नित्याची बाब झाली आहे. मात्र, सोमवारी दुपारी मणिभवन येथे पर्यटकांना घेण्यास बस आल्यावर तेथील वाहतूक पोलिसाने बसचालकासह अमेरिकेतून आलेल्या पर्यटकांनाही जोरात ओरडण्यास सुरुवात केली, त्यामुळे सगळेच अमेरिकी नागरिक घाबरले. बसचालकाचा वाहन परवाना जप्त करून त्याने बस अध्र्या तासाने जाऊ दिली. गेले अनेक दिवसांपासून आम्ही यांच्या अरेरावीचा त्रास सहन करत असून हा प्रकार जास्त झाल्याने मी त्याचे फोटो काढून फेसबुकवर टाकत वस्तुस्थिती उघड केली. याबाबत, बोलताना मार्गदर्शक चित्रा आचार्य म्हणाल्या की, आम्ही बहुतेक गाइड महिला आहोत. या पोलिसांचा त्रास नेहमीचा असून आमच्या बसमधून ते पर्यटकांसाठी असलेल्या पाण्याच्या बाटल्या फुकट घेतातच वर चालकाकडून पैसे घेतात आणि पर्यटक व आमच्यावर ओरडतात. सोमवारी क्रॉफर्ड मार्केट येथे एका स्थानिक नागरिकाने वाईट टिप्पणी केल्याने मी त्याला पोलीस ठाण्यातच नेले.