अंधेरी, घाटकोपर स्थानकांवर सौरपटल

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी मुंबई मेट्रोवनने आता स्थानकांच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणारी ऊर्जा सौरऊर्जेद्वारे प्राप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंधेरी आणि घाटकोपर या दोन मोठय़ा स्थानकांची निवड करण्यात आली असून या स्थानकांवर सौरपटल उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

हे काम लवकरच पूर्ण होणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच मेट्रोची ही दोन स्थानके सौरऊर्जेचा वापर करतील. याद्वारे वीज बचत होणार असून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने मेट्रोने टाकलेले हे पहिले पाऊल ठरणार आहे.

मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीने मेट्रोच्या दुसऱ्या वर्धापन दिनापासून ‘गो ग्रीन गो क्लीन’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मेट्रोच्या स्थानकांवर सौरपटल बसवण्यात येणार आहेत. यासाठी रिन्युएबल एनर्जी सव्‍‌र्हिस कंपनीसह करार करण्यात आला असून सुरुवातीला अंधेरी आणि घाटकोपर या दोन स्थानकांवर सौरपटल बसवण्यात येणार आहेत. हे सौरपटल बसवण्यासाठी येणारा खर्च संबंधित कंपनी करणार आहे. त्या बदल्यात या सौरपटलांद्वारे निर्माण होणारी वीज पुढील २५ वर्षांत ५.१० प्रतियुनिट या दराने रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. विकत घेणार आहे.

मुंबई मेट्रोवनला परिचालनवगळता इतर वापरासाठी वर्षभरात ११.०० मेगाव्ॉट एवढय़ा विजेची गरज असते. यात स्थानकांमधील दिवे, विद्युत यंत्रणा, सरकते जिने, जाहिरातींचे फलक, इंडिकेटर्स आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. मेट्रो स्थानकांवर सौरपटल बसवल्यानंतर वर्षभरात २.३० मेगाव्ॉट एवढी वीजनिर्मिती होणार आहे. त्यातून ३.२ दशलक्ष युनिट दरवर्षी निर्माण होणार आहेत.

वीज निर्मितीसह मेट्रोवनने आता आपली स्थानके, आगार आणि प्रशासकीय इमारती येथील दिव्यांमध्येही बदल केले आहेत. मेट्रोवनने आता एलईडी दिवे बसवले असून या दिव्यांमुळे वीज बचत होणार आहे. मुंबई मेट्रोवनचा प्रवास हा या आधीही पर्यावरणस्नेही होता.

स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोवनचा पर्याय मुंबईकरांना अवलंबला आहे. यापुढेही कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येईल, असे मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी सांगितले.