उद्योगपती मुकेश अंबानी धमकी तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला.

ते केंद्रशासित प्रदेशातील आयपीएस अधिकारी असून त्यांची पाच वर्षांसाठी ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त  होणारे महानिरीक्षकपद भरण्यासाठी उपमहानिरीक्षक ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांना बढती देण्यात आली होती. त्यामुळे अंबानी धमकी तसेच मनसुख हत्येच्या तपासाची जबाबदारी वर्मा यांच्याकडे दिली जाईल, असे ‘एनआयए’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘एनआयए’मध्ये संपूर्ण देशासाठी चार महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

या पदासाठीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. अधिकाऱ्याची इच्छा असल्यास आणखी एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला जातो. शुक्ला यांच्यावर कोणती जबाबदारी द्यावी, हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.