राज्यातील सत्तानाटय़ आणि राजकीय साठमारीच्या उबग आणणाऱ्या वातावरणात मराठी भाषकांसाठी सुखद क्षण जवळ येऊन ठेपला आहे. पुलंचे व्यक्तिमत्त्व आणि विचार यांचा अमूल्य ठेवा म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी लिहिलेली अनेक आशयघन पत्रे. अशा काही महत्त्वाच्या पत्रांचा समावेश असलेल्या ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी, ३० नोव्हेंबरला ठाण्यात होत आहे.

‘वसंता यापुढे ‘आहेस का..’ म्हणत त्या त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही, हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगातलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कशातही लक्ष लागत नाही. क्षणोक्षणी त्याची आठवण येते.’ जिवलग असलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या निधनानंतर पुलंनी त्यांचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रातील ही भावना त्यांच्या शोकाकुलतेची जाणीव करून देते. कधी भावोत्कट, कधी परखड, तर कधी खास पुलं शैलीतील खटय़ाळ अशी ही विविधरंगी पत्रे वाचकांच्या जाणिवा नि:संशय समृद्ध करणारी ठरतील.

ठाण्यातील एलबीएस रस्त्यावरील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे होणाऱ्या या प्रकाशन समारंभानिमित्त ज्येष्ठ कलावंत चंद्रकांत काळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘अपरिचित पुलं’ या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कलावंत गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असेल.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘परांजपे स्कीम्स’ हे या विशेषांकाचे मुख्य प्रायोजक असून चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. हे सहप्रायोजक आहेत.

पुलंचे अतिशय जवळचे मित्र असलेले ख्यातनाम कलावंत डॉ. वसंतराव देशपांडे यांनी सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुलंवर लिहिलेला नितांतसुंदर लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या पुस्तकांना पुलंनी लिहिलेल्या प्रस्तावना हा त्यांच्या एकूण लेखनातील महत्त्वाचा भाग म्हटला पाहिजे. असे काही लेखन, पुलंच्या सहवासात मिळालेल्या अर्थगर्भ क्षणांची उजळणी करणारे लेख ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकात आहेत.

विविध वयोगटांतील मराठी वाचकांसाठी पु. ल. देशपांडे यांचे साहित्य आजही अतिशय जवळचे वाटते. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांना आजही मागणी असते.

साहित्य, संगीत, नाटक, सामाजिक क्षेत्र अशा अनेक विषयांत लीलया संचार करणाऱ्या पुलंनी त्यांच्या अनेक सुहृदांना लिहिलेली सुरेख आणि आशयपूर्ण पत्रे हे ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरणार  आहे.

’मुख्य प्रायोजक  – परांजपे स्कीम्स

’सहप्रायोजक – चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

‘आणखी पु. ल.’ प्रकाशन

कधी – शनिवार, ३० नोव्हेंबर

कुठे – हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम)

वेळ- सायंकाळी ६.३० वाजता