‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन रेस्तराँना २९ डिसेंबरच्या रात्री भीषण आग लागली. या अग्नितांडवात १४ जणांचा बळी गेला. याच अग्नितांडव प्रकरणी मोजो बिस्ट्रोचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यापासून युग तुली फरार होता. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणातली ही पाचवी अटक आहे.

याआधी ‘वन अबव्ह’चे तीन मालक अभिजित मानकर, क्रिपेश आणि जिगर सिंघवी यांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा युग तुलीला हैदराबाद विमानतळावर बघितले गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हैदराबाद पोलिसांना संपर्क करून मुंबई पोलीस युग तुलीचा शोध घेत होते. आता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे.

याआधी साधारण आठवडा भरापूर्वी मोजो बिस्ट्रो या रेस्तराँचा आणखी एक मालक युग पाठकलाही अटक करण्यात आली आहे. कमला मिल दुर्घटना घडल्यापासूनच युग तुली फरार झाला होता. त्याला आता अखेर अटक करण्यात आली आहे.

२९ डिसेंबर २०१७ रोजी रात्री वन अबव्ह या पबमध्ये आग लागली. ही आग शेजारीच असलेल्या मोजो बिस्ट्रो या रेस्तराँमध्येही पसरत गेली असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. मात्र अग्निशमन दलाने मुंबई महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार मोजो बिस्ट्रो या रेस्तराँमध्ये आधी आग लागल्याचा दावा करण्यात आला होता. या दोन्ही रेस्टोपबच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. आज अखेर याप्रकरणी युग तुलीला मुंबई पोलिसांनी अटक केली.

मोजो बिस्ट्रो रेस्तराँच्या दक्षिण पूर्व भागात आगीची तीव्रता जास्त होती. तेथील जमिनीवरील लाद्यांचेही आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडद्यांनी पेट घेतला आणि त्यानंतर आग छतापर्यंत पोहोचली. दक्षिण बाजूला आग पसरवणाऱ्या वस्तू नव्हत्या. मात्र, छतावाटे आग सर्वत्र पसरली, असे अग्निशमन दलाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘मोजो’च्या गच्चीमध्ये छप्पर नसलेल्या ठिकाणी बार होता. येथेच बार टेण्डरकडून आगीचे खेळ सुरू होते. मात्र, ही जागा आगीने पेट घेतलेल्या पडद्यापासून दूर होती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.