कपाळावर येणारी केसाची बट आणि वाद हे जणू काही अंतुले यांच्यासाठी समीकरणच होते. मुख्यमंत्रिपदी असताना घेतलेले बेधडक निर्णय असो वा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल निर्माण केलेला संशय, अंतुले नेहमीच वादात राहिले.
बघतो, करतो, निर्णय घेतो, अशी काम करण्याची अंतुले यांची पद्धत नव्हती. एखादी बाब मनास पटल्यास तात्काळ निर्णय घेण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. जनता दरबार हा लोकांना भेटण्याचा उपक्रम त्यांनीच सुरू केला. नागपूरच्या एका जनता दरबारात एका महिलेने तिचे काम होत नसल्याने अंतुले यांना शब्दश: शिव्या दिल्या होत्या. पोलीस त्या महिलेला पकडण्याच्या तयारीत असताना थांबा अशा सूचना दिल्या. त्या महिलेचे ऐकून घेतले आणि दहा वर्षे रखडलेले त्या महिलेचे काम त्यांनी दोन तासांत केले होते. या आणि अशा अनेक निर्णयांमुळे अंतुले नेहमीच वादात सापडले. शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांच्यासोबत अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना केलेली भ्रमंती गाजली होती.
इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. आणीबाणीनंतर काँग्रेसचा पराभव झाल्यावर अनेक भले भले नेते काँग्रेस सोडून गेले, पण अंतुले यांनी गांधी घराण्याची साथ सोडली नाही.याचेच बक्षीस म्हणून १९८० मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर प्रस्थापित आणि मराठा समाजातील नेत्यांना डावलून मुस्लीम समाजातील अंतुले यांना मुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. अंतुले यांची निवड केल्यास पक्षात फूट पडेल, असा इशारा राज्यातील नेत्यांनी दिल्यावर इंदिरा गांधी यांच्या मनात काही वेगळे घोळू लागले. यासाठी पाठविण्यात आलेल्या निरीक्षकाचे विमान मुंबईत उतरणार नाही याची व्यवस्था संजय गांधी यांनी कशी केली, याचा किस्सा गाजला होता. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आदी सारेच नेते विरोधात होते. अंतुले ‘जिझिया कर’ जमा करीत असल्याचा आरोप तत्कालीन महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केला. त्याच रात्री अंतुले यांनी शालिनीताईंची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली होती.
मंत्रिपदी असताना समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याने अंतुले यांनी वाद ओढवून घेतला होता. १९८३ च्या पक्षाच्या कोलकत्ता अधिवेशनात बुटासिंग यांना आणीबाणीनंतर तू कुठे होता, असा सवाल अंतुले यांनी केला होता. दोन्ही वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांची नाराजी ओढवून घेतली होती.

भाजप प्रवेशाचा प्रस्ताव
केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत असताना आपण भाजपमध्ये प्रवेश करावा, असा प्रस्ताव वाजपेयी यांनी आपल्यासमोर मांडला होता, असा दावा अंतुले यांनी करून वाद ओढवून घेतला होता. लोकप्रतिनिधींना योग्य मानसन्मान मिळालाच पाहिजे, असा आदेश त्यांनी काढला होता. लालफीत किंवा कामे करण्यास विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांना अंतुले यांनी सरळ केले होते व त्यातूनही वाद झाला होता.

ए. आर. अंतुले यांच्या निधनाने एक अभ्यासू आणि आक्रमक नेता महाराष्ट्राने गमावला आहे. मुख्यमंत्री असताना अंतुले यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले.
 -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणून ए. आर. अंतुलेसाहेबांची कारकीर्द ही अत्यंत गतिमान आणि प्रभावी राहिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आणि जनकल्याणाचे निर्णय त्यांनी बेधडकपणे घेतले होते.
-अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते

अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष संघटना  मजबूत करण्यासाठी अतोनात परिश्रम घेणाऱ्या अंतुलेसाहेबांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व हरपले आहे.
– माणिकराव ठाकरे,  प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

अंतुले यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि कुशल प्रशासक गमावला आहे. अंतुले नेहमीच घेतलेल्या निर्णयाचे फायदे शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचावेत यासाठी आग्रही असत.
-एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेता