कृषी उत्पन्न बाजार समितीमधून फळे-भाजीपाला तसेच कांदा-बटाटा नियमनमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर सरकारसोबत आज झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपाने बाजारात दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत असल्याने सरकारने संपावर तोडगा काढण्यासाठी आज व्यापाऱयांसोबत तातडीत बैठक बोलावली होती. मंत्रालयात घेण्यात आलेल्या या बैठकीला यश आले असून, शेतकऱयांकडून अडत न घेण्यास व्यापारी राजी झाले आहेत. मात्र जो नियम बाजार समितीच्या बाहेर विक्रीसाठी आहे, तोच नियम बाजार समितीच्या आतमध्ये सुद्धा लागू व्हावा, बाजार समितीच्या आवारात विक्री करण्यासाठी नियमन मुक्ती मिळावे, या मागण्यांसाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात येणार आहे.

वाचा: मंडईपेक्षा मॉल स्वस्त!

दरम्यान, मंत्रालयात बोलविण्यात आलेल्या या बैठकीला सदाभाऊ खोत यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यापाऱयांशी चर्चा केली.

वाचा: मुक्तीमागील हेतूवर शंका

गेल्या काही दिवसांपासून एपीएमसीचा संप सुरू असल्याने फळ-भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे आज होणाऱया बैठकीवर सर्वसामान्यांचे लक्ष लागून होते. तोडगा निघाला नाही, तर व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देखील सरकारने याआधीच दिले होते. मात्र, बैठकीला यश आल्याने लवकरच भाज्यांचे दर खाली उतरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.