पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

‘नमो अ‍ॅप’वरून विविध आरोप-प्रत्यारोप होत असतानाच राज्यातही सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका खासगी संस्थेच्या अ‍ॅपवर राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून माहिती पुरविण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. या संस्थेची पाश्र्वभूमी काय, या संस्थेला नागपूरचे पाठबळ आहे का, असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

राज्य शासनाच्या वतीने ‘महामित्र’ हे समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांसाठी अ‍ॅप तयार केले. गेल्या वर्षी अनुलोम या संघाशी संबंधित संस्थेने अ‍ॅप तयार केले होते. या संस्थेने तयार केलेले अ‍ॅप आणि राज्य शासनाच्या महामित्रच्या सोर्स कोडमध्ये साम्य आढळून आले आहे. महामित्रचा संपूर्ण डाटाबेस अनूलोमच्या संकेतस्थळावरूनच केला जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जमा केलेली माहिती अनुलोम या रा. स्व. संघाशी संबंधित संस्थेला कशी काय दिली जाते, असा सवालही चव्हाण यांनी केला. माहिती हस्तांतरित करण्याकरिता आदान-प्रदानाचा करार राज्य शासन आणि या संस्थेमध्ये झाला आहे का, वापरकर्त्यांची संमती शासनाने घेतली आहे का, असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘फेसबुक’ या समाजमाध्यमाचा गैरवापर करून अमेरिका आणि ब्रिटनमधील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा घोटाळा नुकताच उघडकीस आला.

शासकीय मोबाईल अ‍ॅपवरील वापरकर्त्यांचा डेटा संमतीशिवाय खासगी संस्थेला हस्तांतरित करण्यात आला आहे.

याबाबत शासनाने दिलगिरी व्यक्त करावी. अनुलोम या संस्थेची पाश्र्वभूमी काय आहे, रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता शासकीय अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे का, असे प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

महामित्रअ‍ॅपवरील माहिती सुरक्षित : पाटील

‘महामित्र’ या उपक्रमासाठी कोणतीही खासगी माहिती विचारण्यात आलेली नव्हती. सहभागी होणाऱ्या व्यक्तींची खातरजमा होण्यासाठी तसेच उपक्रमातील पुढील कार्यवाहीबाबत तपशील देण्यासाठी केवळ मोबाइल क्रमांक आणि ई-मेल पत्ता नोंदविण्यास सांगण्यात आले होते. याव्यतिरिक्त कोणतीही खासगी अथवा गोपनीय माहिती मागितली नव्हती. ही सर्व माहिती अ‍ॅपवर सुरक्षित आहे. ती कोणत्याही खासगी संस्थेला देण्याचा प्रश्नच नाही, असे निवेदन सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत केले.अनुलोम या संस्थेचे स्वत:चे मोबाइल अ‍ॅप आणि महामित्र या उपक्रमासाठी तयार करून घेतलेले अ‍ॅप याचा सुतराम संबंध नाही. हे दोन्ही अ‍ॅप वेगवेगळे आहेत, असेही रणजित पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले.