मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आणखी ३४ हजार जागांची भर पडली आहे. अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ातील रिक्त जागा ऑनलाइनमध्ये प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइनसाठी आधी जाहीर केलेल्या १ लाख ५४ हजार जागांमध्ये आणखी ३४ हजार जागांची भर पडली आहे. या जागांच्या प्रवेशाकरिता ऑनलाइनसाठी अर्ज भरलेल्या १,९७,२८९ विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे.
 या विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी २२ जून रोजी जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी (१,८७,१२०) अर्थातच राज्य शिक्षण मंडळाचे आहेत. त्या खालोखाल आयसीएसईच्या ५७९५ आणि सीबीएसईच्या ३४६३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइनमधून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त केली आहे.