मुंबई : महाराष्ट्रातील डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे मूळ सूत्रधार शोधायचे असतील, तर सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे ५०० तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने करावी, असे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. सोमवारी पुण्यात निघालेल्या मोर्चातून हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी या वेळी जाहीर केले. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांत आजवर फक्त प्यादे जेरबंद झाले आहेत.  या चारही हत्या प्रकरणांत सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत, असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केले.

‘शिवसेनेने पाठराखण थांबवावी’

या आधी राज्यातील काही घातपाती घटनांमध्ये सनातन संस्थेचे कार्यकर्ते सामील असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्याकडे बॉम्ब व स्फोटके सापडली आहेत, त्यांना अटकही झाली होती. मात्र त्या वेळीही शिवसेना सनातन संस्थेची पाठराखण करीत होती. परंतु आता तरी शिवसेनेने जागे व्हावे आणि अशा लोकांची पाठराखण करणे थांबवावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना नालासोपारा स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे असे आणखी लोक सनातनच्या गळाला लागण्याची भीती असल्यामुळे शिवसेनेने सावध व्हावे असा सल्ला त्यांनी दिला.