कलादालनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या, चित्र-शिल्पांची चर्चा करणाऱ्या वृत्तपत्रीय सदरांमध्ये काही प्रदर्शनांबद्दल कधी लिहिलंच जात नाही. तशा प्रदर्शनांची किंवा कलाकृतींची तीन उदाहरणं सध्या समोरच आहेत!  साकीनाका भागात सध्या भरलेलं एक फोटो प्रदर्शन आहे :  श्रमिकांसह काम करणाऱ्या ‘आजीविका ब्युरो’ या संस्थेनं कार्यालयातच (श्रमिक सहायता एवं संदर्भ केंद्र, दुकान क्र. ३, कैलाश शॉपिंग सेंटर, ९० फीट रोड, नेताजीनगर कुर्ला इथं) १७ फोटो मांडून ते भरवलं आहे. एकंदर ३२ कामगारांनीच आपापल्या मोबाइलवरून किंवा दुसऱ्याचा स्मार्टफोन घेऊन त्यावरून- काढलेले हे सारे फोटो, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना किती भीषण परिस्थितीत काम करावं लागतं, याचं दर्शन घडवणारे आहेत. डिसेंबरच्या १७ तारखेपासून प्रदर्शन सुरू झालं आणि २० डिसेंबरला १२ कामगारांचे बळी घेणारी आग साकीनाका परिसरातच लागली. त्यावरून तरी हे प्रदर्शन किती ‘खरं’ आहे याची कल्पना यावी.

दुसरं प्रदर्शन वरळीच्या बीडीडी चाळ भागात (चाळ क्र. ११४, गाला वूड वर्क्‍स कंपाऊंड, वरळी) इथं भरलं आहे. कार्तिकेय शर्मा हे पॉप संगीत आदींच्या ‘इव्हेन्ट’-स्थळी जी चित्रं काढली जातात, त्यातले उस्ताद; पण त्यांना कर्करोगानं गाठलं. आता या विकाराशी झुंजतच त्यांनी आपल्या चित्रांचं हे प्रदर्शन भरवलं आहे. काही चित्रं अमूर्त आहेत, तर काहींमध्ये ओळखू येण्याजोगे आकार आहेत; पण त्यांच्या नेहमीच्या कामापेक्षा ही चित्रं नक्की निराळी आहेत, हे लक्षात येईल.

कलाकृती दिसण्याची तिसरी अनपेक्षित जागा म्हणजे धारावी! माहीम स्थानकातून धारावीकडे जातानाच, शाहूनगरच्या एका इमारतीची भिंत चित्रमय झालेली दिसेल. अशा बऱ्याच भिंती या भागात दिसणार आहेत. कुलाब्याच्या ससून डॉकप्रमाणेच इथं ‘आर्ट फॉर ऑल’ हा दृश्यकला-उत्सव (३० डिसेंबपर्यंतच) सुरू आहे.

गॅलऱ्याही तुडुंब!

काळा घोडा भागात राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (एनजीएमए), छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), जहांगीर आर्ट गॅलरी आणि तिच्याच मागची मॅक्समुल्लर भवनाची गॅलरी या चारच ठिकाणी भेट दिली तरी तिकिटासाठी साधारण ९५ रुपये जातील; पण ११ ते ६ हा वेळ कमी पडेल. एक म्युझियम पाहायलाच अख्खा दिवस लागेल, कारण इथं आता ‘देश-परदेश’ हे नवं प्रदर्शनही आहे! बाकी कुलाब्याच्या खासगी गॅलऱ्यांमध्ये जाण्यापूर्वी आधी काळा घोडा भागातच, आता बंद झालेल्या ‘ऱ्हिदम हाऊस’कडून बेने इस्रायली सिनेगॉगकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे ‘दिल्ली आर्ट गॅलरी’तलं नटवर भावसार यांच्या १९७६ ते आजवरच्या रंगवेल्हाळ अमूर्त-चित्रांचं सिंहावलोकनी प्रदर्शन आणि त्याही पुढे, ओल्ड कस्टम हाऊसकडे जाताना डावीकडे ‘ड्रेसवाला हाऊस’मध्ये लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘रुक्शान आर्ट गॅलरी’मधलं बडोद्याचे ज्येष्ठ मुद्राचित्रणकार आणि छायाचित्रकार ज्योती भट्ट यांनी १९६६ पासून टिपलेल्या छायाचित्रांपैकी प्रामुख्यानं आदिवासी जीवनातील कलेच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, ही दोन्ही प्रदर्शनं पाहण्यासारखी आहेत. ज्योती भट्ट यांनी राठवा, मीणा अशा जमातींच्या घरांची भिंत किंवा जमीन यांवरल्या चित्रांसह माणसंही टिपली आहेत. एका देवळाची भिंत, त्यावर जरा अभिजाततावादी भारतीय शैलीनं केलेलं रामपंचायतनाचं भित्तिचित्र आहे आणि त्याखाली एक (बहुधा आदिवासी) वृद्धा बसली आहे.. या छायाचित्राचं नाव ‘शबरी’! ज्योती भट्ट हे केवळ छायाचित्रकार नसून भारतीय संस्कृतीचे जाणकार आहेत, हे इथल्या अनेक चित्रांतून दिसेलच.

कुलाब्यात ‘साक्षी गॅलरी’मध्ये ‘प्रिझवर्ि्हग ट्रॅडिशन्स’ हे प्रदर्शन १९ जानेवारीपर्यंत सुरू राहील. नावाप्रमाणेच, पारंपरिक किंवा जुन्या प्रतिमा वापरून नव्यानं केलेली चित्रं इथं आहेत. या प्रतिमा कधी डिजिटल, कधी हातीच आपापल्या पद्धतीनं रंगवलेल्या स्वरूपात समोर येतात. के जी सुब्रमणियन, गुलाममोहम्मद शेख, अंजू दोडिया, एन एस हर्षां, रेखा रौद्वित्य, मंजुनाथ कामत आदी एकंदर १४ चित्रकार/ शिल्पकारांच्या या कलाकृतींतून हाताळणीतलं वैविध्य दिसतं. याखेरीज, पाहिलंच पाहिजे असं प्रदर्शन म्हणजे एल एन तल्लूर यांच्या शिल्पांचं, ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ इथलं प्रदर्शन. पण त्याबद्दल पुढल्या आठवडय़ात.. किंवा पुढल्या ‘वर्षी’! हा ‘गॅलऱ्यांचा फेरा’ २०१८ मध्ये कदाचित गुरुवारऐवजी वेगळय़ा दिवशी असेल, पण असेल हे नक्की.

निषेधाला कलाकौशल्य व बुद्धीची झळाळी

‘जहांगीर’मधल्या प्रदर्शनांपैकी अभिषेक पाटील, मनोहर राठोड आणि प्रफुल्ल नायसे यांचं ‘सभागृह दालना’त भरलेलं प्रदर्शन आणि वातानुकूल दालन क्रमांक दोनमध्ये भरलेलं पराग बोरसे यांच्या चित्रांचं प्रदर्शन, ही दोन्ही प्रदर्शनं यथादृश्यवादी चित्रांच्या विविध वाटा दाखवणारी आहेत. बोरसे यांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांसोबतच, कागदावर पेस्टलनं केलेली चित्रं लक्षवेधी आहेत. अभिषेक पाटील यांचं मानवाकृती चित्रण हे आजच्या- डिजिटल युगातलं आहे. फोटो एडिटिंगची तंत्रं आता मोबाइलवरही उपलब्ध आहेत खरी, पण त्या पद्धतीची प्रतिमा जर चार फूट रुंद आणि तेवढय़ाच रुंद कॅनव्हासवर, अ‍ॅक्रिलिक रंगांनी रंगवलेली असेल तर ती फोटोपेक्षा निराळा – म्हणजे पोताचा, रंगलेपनाचा, अवकाशाचा अनुभव देते. या मालिकेतल्या अखेरच्या चित्रात, रंग ओघळू देऊन रंगवस्तूचं अस्तित्व अधिक स्पष्ट करणारं दृश्यविधान पाटील यांनी केलं आहे. मनोहर राठोड यांनी गोर (बंजारा) समाजातल्या स्त्रियांची चित्रं काढताना रंगभरण-रंगलालित्य, चेहऱ्यांमधला स्पष्टपणा आणि धूसरपणा यांचा दृश्यखेळ तर रंगवला आहेच, पण या सर्व चित्रांच्या शीर्षकांमधून त्यांनी ‘कोर’ (म्हणजे ‘गोर’ समाजाबाहेरच्या सर्व) लोकांना माहीत नसलेला, संस्कृतीचा पटही उलगडलेला आहे.

प्रफुल्ल नयासे यांनी आजचं राजकारण, त्यात गप्प बसवला जाणारा सामान्य विवेकी-विचारी माणूस, कुठल्याही योजनांच्या प्रशासनांमधील ‘कावळे’गिरी या विषयांवर, कलात्मकता अजिबात न सोडताही निषेधाचा सूर लावणारी चित्रं साकारली आहेत. कल्पनाशक्ती आणि बुद्धी वापरून चित्रविषयाची मांडणी नयासे ठरवतात; पण पुढे या चित्राची हाताळणी अत्यंत कौशल्यपूर्णरीत्या करतात. त्यामुळे ‘प्रोटेस्ट आर्ट’ म्हणून घाईगडबडीत ‘एग्झिक्यूट’ केलेल्या कलाकृतींपेक्षा ही चित्रं निराळी ठरतात! कला संचालनालयातल्या घोळाबद्दल थेट भाष्य करणारी दोन चित्रं इथं मांडलेली आहेत. ती अतिशय संयत असली, तरी विषयाला त्यातून तोंड फुटतं आणि निषेध करायलाच हवा असं कलावंताला वाटतंय ते का, हेही चित्रातूनच समजून घेता येतं.