मॅचलॉक बंदुकांनी युद्धतंत्रात मोठा बदल घडवला असला तरी त्यात अनेक त्रुटी होत्या. मॅचलॉक पद्धतीत चाप ओढल्यावर पॅनमध्ये प्रथम लहानसा भडका उडत असे. त्याने प्रत्येक वेळी फायरिंग चेंबरमधील दारू पेट घेईलच याची शाश्वती देता येत नसे. त्यावरूनच इंग्रजीतील ‘फ्लॅश इन द पॅन’ (एकदाच, अचानक मिळालेले यश, जे वारंवार घडू शकत नाही) असा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. तसेच हा पहिला पॅनमधील लहानसा स्फोट आणि फायरिंग चेंबरमधील मुख्य स्फोट या दोन्हींत थोडासा वेळ जात असे. त्यामुळे पहिल्या झगमगाटामुळे आणि आवाजामुळे शत्रू सावध होत असे. अंधारात लढताना त्याचा परिणाम अधिक जाणवत असे. तरीही त्याचा युद्धात फारसा फरक पडत नसे. त्याने सैनिकांपेक्षा शिकाऱ्यांची मोठी अडचण होत होती. पहिल्या आवाज आणि प्रकाशाने प्राणी किंवा पक्षी सावध होऊन पळून जात असत.

याशिवाय पावसाळी आणि ओलसर वातावरणात गनपावडर आणि मॅचलॉकने वेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या. पावसाळ्यात बंदुकीला बत्ती देणारी वात विझून जात असे. त्यामुळे मॅचलॉक बंदुका पावसात वापरता येत नसत. त्याउलट उन्हाळी आणि कोरडय़ा वातावरणात गनपावडर आणि पेटती वात जवळ आल्यास स्फोट होऊन अपघाताचे प्रमाण वाढत असे. त्यामुळे सर्व हवामानांमध्ये बंदुकीला खात्रीशीरपणे बत्ती देणारी पद्धत (फायरिंग मेकॅनिझम) शोधण्याची गरज होती. फ्लिंट-लॉक पद्धतीने त्यावर उपाय उपलब्ध करून दिला.

या प्रकारात गनपावडरला प्रज्ज्वलित करण्यासाठी पेटत्या वातीऐवजी गारगोटीच्या दगडाचा (फ्लिंटस्टोन) वापर केला जात होता. बंदुकीला हॅमर किंवा कॉक नावाचा दोन बोटांच्या चिमटीसारखा किंवा पक्ष्यांच्या चोचीसारखा एक भाग असे. त्यात फ्लिंटस्टोनचा छोटा आयताकृती तुकडा बसवलेला असे. त्याच्या पुढे एक धातूची काहीशी वक्राकार पट्टी बसवलेली होती. तिला फ्रिझन म्हणत असत. पट्टीचा आतील पृष्ठभाग काही वेळा खरबरीत केलेला असे. बंदुकीत बार भरून चाप ओढला की हॅमर खाली येत असे. त्यावेळी त्यात बसवलेला फ्लिंटस्टोन समोरील फ्रिझनवर घासून  ठिणग्या तयार होत. त्या ठिणग्या फ्लॅश पॅनमध्ये जाऊन गनपावडर पेटत असे आणि गोळी डागली जात असे. साधारण ५० वेळा वापरल्यानंतर हॅमरमधील गारगोटीचा तुकडा बदलावा लागत असे.

त्याच दरम्यान व्हिललॉक नावाचा प्रकारही अस्तित्वात आला. यामध्ये बंदुकीला बत्ती देण्यासाठी घडय़ाळाच्या स्प्रिंगसारखी व्यवस्था असे. ट्रिगर दाबल्यावर गुंडाळलेली स्प्रिंग सुटी होताना फ्लिंट किंवा अन्य ज्वालाग्राही पदार्थावर तिचे घर्षण होऊन ठिणग्या पडत आणि बंदुकीची दारू पेटत असे. मात्र ही पद्धत उत्पादनास अवघड व महाग आणि वापरास नाजूक असल्याने तिचा वापर सैन्यात कमी झाला. त्यापेक्षा श्रीमंत हौशी शिकाऱ्यांमध्ये व्हिललॉक बंदुका अधिक लोकप्रिय होत्या. फ्लिंटलॉक आणि व्हिललॉक पद्धतीने बंदुका वापरासाठी बऱ्याच सुटसुटीत आणि सुरक्षित झाल्या. आजवर बंदुकांची लांबी मोठी होती. त्या घोडय़ावर स्वार होऊन वापरणे जिकिरीचे होते. आता त्यांची लांबी कमी करून सुरुवातीचे पिस्तूल बनवले गेले. हे पिस्तूल घोडदळाच्या सैनिकांसाठी खूपच सोयीचे होते. एका हाताने घोडय़ाचा लगाम धरून दुसऱ्या हाताने पिस्तूल डागणे सोपे असल्याने ही शस्त्रे घोडदळातही पसंतीस उतरली.

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com