23 March 2019

News Flash

कृत्रिम बुद्धिमत्तेची उद्योगसंकुले उभारणार

मुख्यमंत्र्यांच्या कॅनडा दौऱ्यात सामंजस्य करार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुख्यमंत्र्यांच्या कॅनडा दौऱ्यात सामंजस्य करार

कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर वाढविण्याबरोबरच या क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची उद्योगसंकुले (क्लस्टर्स) उभारण्यात येणार आहेत.

कॅनडाच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉन्ट्रिएल येथे क्युबेकच्या उपपंतप्रधान डॉमनिक अँग्लेड यांची भेट घेतली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत त्यांच्यात विचारविनिमय झाला. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामगिरीची अँग्लेड यांनी प्रशंसा केली. क्युबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली ‘एफआरक्यू एनटी’ संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्युबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी ‘एफआरक्यूएनटी’चे रेमी क्युरिऑन उपस्थित होते. या करारानुसार कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेक्स्ट एआय संस्थेसह सामंजस्य करार करण्यात आला. ‘नेक्स्ट एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेल्डोन लेव्ही यावेळी उपस्थित होते. राज्यातील ५० स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट एआय ही संस्था काम करणार आहे.

मॉन्ट्रिएल येथे क्युबेकमधील इन्स्टिटय़ूट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशनचे (आयव्हीएडीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी गिलेस सॅवर्ड यांच्यासह महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. आयव्हीएडीओच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सुमारे एक हजार संघटना एकत्रित काम करीत असून यातून मोठय़ा प्रमाणात संशोधन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगसंकुले तयार करण्यासाठी आयव्हीएडीओसोबत महाराष्ट्रातील आयआयटी आणि विद्यपीठे एकत्रितपणे काम करतील. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे रोजगारसंधी कमी होण्याची भीती पूर्णपणे निराधार असून उलट यामुळे मोठय़ा संख्येने रोजगारनिर्मिती होईल. अनेक समस्यांचे निराकरण होऊन गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी भरून निघेल, अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ऑफ द अमेरिकाच्या वतीने आयोजित प्रशासन आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स या विषयावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त केली. क्युबेकच्या उपपंतप्रधानडॉमनिक अँग्लेड, यूबीसॉफ्टचे कॉर्पोरेट अफेअर्स उपाध्यक्ष फ्रान्सिस बेटलेट आणि गुगल कॅनडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी जोस लॅमोथ यावेळी उपस्थित होत्या. माहितीची विसंगती पाहता सर्वसामान्यांना प्रदान करावयाच्या सेवांच्या संदर्भातसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुर्गम भागात रुग्णाचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सेवा प्रदान करताना तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान बदलाच्या युगात शाश्वततेसाठी तंत्रज्ञानाची निकड, तंत्रज्ञानाच्या वापरात सरकारची भूमिकाही त्यांनी मांडली. भारतासह महाराष्ट्र अतिशय वेगाने प्रगती करीत असून या विकासपर्वात भागीदारी करण्यासाठी कॅनडातील उद्योग समूहांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्युबेक सिटी येथे केले. कॅनडा-इंडिया बिझनेस काऊन्सिलच्या वतीने (सीआयबीसी) आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूप, कॅनडाचे मुंबईतील कॉन्सुल जनरल जॉर्डन रिव्हज उपस्थित होते.

First Published on June 13, 2018 12:44 am

Web Title: artificial intelligence 4