मुंबईमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असतानाच आता मुंबईकरांना नवीन चिंतेने ग्रासले आहे आणि ती चिंता म्हणजे टोळधाडीची. सोशल नेटवर्किंगवर मुंबईत टोळ दिसू लागल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या टोळधाडी संदर्भात माहिती देणाऱ्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषी आय़ुक्त सुहास दिवस यांनी मुंबईकसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केलं आहे. “भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे बुधवारी रात्री टोळधाड होती. तेथून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास नदी ओलांडून तिने मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे. मुंबईला टोळधाडसंदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या फिरत असलेली माहिती या अफवा आहेत.” अशी माहिती दिवस यांनी दिली. कृषी खात्यातील कर्मचारी याबाबत दक्ष असून टोळधाडीच्या मागावर असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

टोळ केवळ पूर्व महाराष्ट्रातील काही भागांमध्ये असल्याचे एएलओने म्हटले आहे. “टोळधाडी महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांपुरत्या मर्यादित आहेत. खास करुन विदर्भातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हे टोळ महाराष्ट्राच्या पूर्वभागांमधील काही जिल्ह्यांमध्ये आले आहेत,” असं एएलओचे उपसंचालक के. एल. गुजजार यांनी सांगिलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे. “मुंबईच्या दमट हवामानामध्ये टोळ जगू शकतात. असं असलं तरी मुंबईवर टोळधाड पडण्याची शक्यता कमी आहे. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांवरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे टोळ मुंबईत प्रवेश करण्याची शक्यता नाहीय,” असं गुजजार यांनी म्हटलं आहे. एएलओचे टोळधाडींसंदर्भातील हलचालींवर लक्ष असून मुंबई तसेच कोकणपट्ट्यामध्ये टोळधाडीसंदर्भातील इशारा देण्यात आलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गुरुवारी मुंबईमधील अनेकांनी सरकारी यंत्रणांना फोन करुन मुंबईत टोळ दाखल झाले आहेत का यासंदर्भात चौकशी केल्याचे ‘मीड डे’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलंय. तर ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या ट्विटरच्या हवाल्याने मुंबईमध्ये टोळ दिसत असल्याचे वृत्त दिलं.

नक्की वाचा >आवाज वाढव डीजे… टोळधाडीवर जालीम उपाय म्हणून शेतातच लावला डीजे

रविवारी मध्यप्रदेश व राजस्थानातून महाराष्ट्रात कीटकांचा झुंड (टोळधाड) धडकला. सर्वात आधी नागपूर जिल्ह्य़ातील काटोल तालुक्यात कीटकांनी पिकांवर हल्ला केला. फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गांदी या परिसरात टोळ आढळून आले.  यात  पिकांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी दुपारच्या सुमारास हे टोळ भंडादरा जिल्ह्यामधील मोहाडी आणि तुमसार तहसीलमधील गावांमध्ये अढळून आल्याचे वृत्त समोर आलं होत. त्यानंतरच मुंबईमध्ये टोळ दिसत असल्याचे दावा करणारे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत. “टोळ मुंबईत दाखल झाले. गोरेगाव आणि मालाडमध्ये टोळ मोठ्या संख्येने दिसून येत आहेत,” असे मेसेजेस व्हॉट्सअपवर व्हायरल होताना दिसत आहेत.


शोभा डे यांनी केलेल्या ट्विटमध्ये एका किड्याचा फोटो पोस्ट करत मुंबईत टोळ दाखल झाले आहेत असा दावा केला आहे.

अन्य काही व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुनही मुंबईत टोळ दिल्याचे ट्विट करण्यात आलं. अनेकांनी हे टोळ १५० किमी प्रवास करुन शकतात. त्यामुळे आज रात्री मुंबईत ठिकठिकाणी टोळधाडी पडतील असा दावा करणारे मेसेजेस फॉर्वड करत दारे खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन केलं.


मुंबईला धोका नाही तरी टोळ आले तर?

‘मिड डे’ने या व्हिडिओसंदर्भात नागपूरमधील कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्रातील प्राध्यापक डॉ. अनिल कोल्हे यांच्या हवाल्याने वृत्त देताना व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील किडे हे टोळच असल्याचे म्हटले आहे. मात्र या व्हिडिओमधील जागांबद्दलची सत्यता पडताळून पहावी लागेल असं मत त्यांनी नोंदवलं आहे. तसेच मुंबईमध्ये टोळधाड पडली तर ती गुजरामधून येतील अशी शक्यता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमध्ये पाकिस्तानमधून टोळ आले आहेत. “मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये मोठ्याप्रमाणात झाडे आहेत. टोळधाड पडली तर या झाडांचे मोठे नुकसान होईल. प्रशासनाला यासंदर्भात तातडीने पावले उचलावी लागतील. हे टोळ झाडांची पान, वागांमधील गवत आणि सर्व हिरवळ उद्धवस्त करुन टाकतील. त्यांची संख्या पाहता आणि सध्याची मुंबईमधील करोनामुळे झालेली परिस्थिती पाहता हे संकट मोठं ठरु शकतं,” असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे.