निवडणुकांमधील जयपरायज मी लहानपणापासून पाहात आलो आहे. पराजयाने खचून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत मनसे वाढणार हा आत्मविश्वास घेऊन तुम्ही कामाला लागा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्याचप्रमाणे यापुढे स्काइपवर आपण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी नियमितपणे संपर्क साधू असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर लहानपणापासून वावरताना अनेक पराभव पाहिले आहेत. पराभवातून शिकण्यासारखे खूप काही असते असे सांगून गेल्या काही निवडणुकांमधील सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे असल्याचे राज यांनी सांगितले. यापुढे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम करायचे याची चौकट मी आखून देणार असून त्यानुसारच त्यांना काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कधी मिश्कील तर कधी गंभीर होत अनेक किस्से सांगून राज यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र गेल्या काही दिवसांत मनसेला लागलेली गळती आणि माजी आमदार प्रवीण दरेकर व वसंत गीते यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयबाबत मौन पाळणेच पसंत केले.
टुथ पेस्ट, ब्रश आणि दाढीचा रेझर कोणी बनवला, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना केला असता ‘माहीत नाही’ असे उत्तर मिळाले. त्यावर मलाही माहीत नाही, असे सांगून प्रत्येक पदाधिकाऱ्याने काम करत राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. तुमच्या प्रत्येक कामाची दखल घेतलीच जाईल, असे होणार नाही, होऊ शकत नाही, असे सांगत जात-पात न पाहता लोकांची कामे करा असे ते म्हणाले. शाखाअध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी गोळा केलेला निधी यापुढे बँकेच्या खात्यात भरला पाहिजे व कोशाध्यक्षाच्या मदतीने पक्षाच्या कार्यासाठीच तो निधी वापरला पाहिजे असेही ते म्हणाले.