News Flash

भाजपची स्वबळाची तयारी सुरू

पक्षाध्यक्ष अमित शहा जूनमध्ये तीन दिवस राज्यात दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष अमित शहा. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पक्षाध्यक्ष अमित शहा जूनमध्ये तीन दिवस राज्यात दौऱ्यावर

भाजपने २०१९ च्या लोकसभा आणि गरज पडल्यास विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी पूर्वतयारी सुरु केली आहे. १६ ते १८ जून यादरम्यान पक्षाअध्यक्ष अमित शहा हे मुंबईसह राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंत्री, आमदार-खासदारांच्या कामांची झाडाझडती, समाजातील विविध स्तरातील मान्यवरांशी संवाद साधून केंद्र- राज्य सरकारच्या कामगिरीबाबत त्यांची मतेही अजमावली जाणार आहेत. शिवसेनेची डोकेदुखी वाढतच गेली किंवा त्यांनी पाठिंबा काढला, तर मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपने सुरु करुन शिवसेनेला सूचक इशाराही दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमित शहा हे काही राज्यांच्या दौऱ्यावर असून पक्षाच्या सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविणे व पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजप सरकार सत्तेवर असतानाही शिवसेना विरोधी पक्षांपेक्षाही अधिक त्रासदायक ठरली आहे. शिवसेनेची डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाऊन स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याने आणि मध्यावधी निवडणुका झाल्या तर स्वबळावर सत्ता मिळेल, असे सर्वेक्षणाचे अहवाल आल्याने भाजपमध्ये गंभीरपणे त्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. त्याबाबत जुलै-ऑगस्टमध्ये निर्णय होणे अपेक्षित आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली असून त्याचा लाभ मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही होईल, असे नियोजन आहे. या पाश्र्वभूमीवर अमित शहा यांच्या जूनमध्ये मुंबई व राज्यात होणाऱ्या तीन दिवसांच्या दौऱ्याला महत्व आहे. राज्यातील महत्वाच्या काही शहरांमध्ये आणि मराठवडय़ासह ग्रामीण भागातही शहा हे जाण्याची शक्यता असून, त्याबाबत नियोजन सुरु आहे.

’या दौऱ्यात अमित शहा हे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करुन केंद्र व राज्य सरकारविषयीच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या आहेत, लोकप्रतिनिधींबाबत समाधानी आहेत का, यासह अन्य बाबी ते जाणून घेतील.

  • आमदार-खासदारांनी आपल्या मतदारसंघात आतापर्यंत कोणती कामे केली, यासह मंत्र्यांच्या कामाचा आढावाही ते वेगवेगळ्या बैठकांमध्ये घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
  • भाजपची ताकद वाढविण्यासाठी राज्यातील ९० हजार मतदारसंघ बूथनिहाय असलेल्या संपर्क यंत्रणेचा व कार्यकर्त्यांची फळी उभारण्याबाबतच्या तयारीचीही ते माहिती घेतील.
  • पुढील लोकसभेची निवडणूक भाजपला स्वबळावरच लढवायची असल्याने शिवसेनेशी टक्कर घेण्याच्या दृष्टीने ही तयारी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:49 am

Web Title: assembly elections amit shah bjp
Next Stories
1 झोपु सुधार मंडळात बनावट चाचणी प्रमाणपत्रांचा घोटाळा!
2 राज्यातील १४ वीजनिर्मिती संच बंद पडणार
3 पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
Just Now!
X