कांदिवली पोलीस ठाण्यात दाम्पत्याला पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे. एका व्यावसायिकाने कांदिवली पोलिसांविरुध्द तक्रार अर्ज दाखल केला होता. वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्याला भेट देणार असल्याने या दाम्पत्याची तक्रार नोंदवून न घेता हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार या व्यावसायिकाने केली आहे.
राकेश शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाने ११ मे च्या रात्री कांदिवली पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला मारहाण केल्याचा दावा केला होता. त्याविषयीचा तक्रार अर्ज शनिवारी कांदिवली पोलिसांना त्याने दिला. या तक्रार अर्जात मोबाईल हरविल्याची तक्रार करण्यासाठी आलेले दाम्पत्य पोलीस ठाण्यात बसून असताना, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदविण्यास नकार दिला.
यावरुन दोघांमध्येही बाचाबाची झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्याला भेट असल्याने कोणीही तक्रारदार नको, म्हणून पोलिस काठीने मारत या दाम्पत्याला अक्षरश हाकलत असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. त्याचे चित्रीकरणही आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा शेट्टी करत आहेत. दरम्यान, याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून या प्रकरणाचा तपास बोरिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सूधाकर पूजारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शेट्टी यांनी केवळ तक्रार अर्ज दिला असून ते सांगत असलेले चित्रीकरण त्यांनी अद्याप सुपूर्द केलेले नाही. हे चित्रीकरण कधीचे आहे, याची शहानिशा करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.