प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधीचा अधिकार साहाय्यक आयुक्तांना देण्याचा ठराव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व पक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला असून, हा ठराव आता महापालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात सर्व सदस्य महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधी मिळतो. मात्र, त्यांना हा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. या संदर्भात, सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्य मीनाक्षी शिंदे आणि भाजपचे सदस्य संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली. तसेच निधी मिळत नसल्याने प्रभागातील नागरी कामे करायची कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधी सहाय्यक आयुक्त मंजूर करतात. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी उपायुक्तांकडे पाठविण्यात येतो. या सर्व प्रक्रियेमुळे निधी मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधीचा अधिकार सहायक आयुक्तांनाच देण्यात यावा, असा ठराव सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मांडला. त्यास विरोधी पक्ष नेते हनुमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले.

पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्क दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणला होता. मात्र, त्यास विरोध करत सर्वच सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले.