News Flash

छोटा शकील टोळीची धरपकड

अल्लारखा नावाच्या बेरोजगार तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

कुख्यात गुंड छोटा शकील (संग्रहित छायाचित्र)

‘एटीएस’कडून गुजरातचा संशयित ताब्यात; दुसरा दुबईला पसार

मुंबई : पाक प्रशिक्षित फैजल मिर्झा या संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कुख्यात गुंड छोटा शकीलच्या विश्वासू हस्तकांची धरपकड, चौकशी सुरू केली. दरम्यान, एटीएसच्या एका पथकाने मंगळवारी गुजरातच्या गांधीधाम परिसरात दडलेल्या अल्लारखा नावाच्या बेरोजगार तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. फैजलच्या चौकशीतून अल्लारखा याची माहिती पुढे आली. मुंबई, गुजरातेत दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या स्फोटकांच्या वाहतुकीची जबाबदारी अल्लारखावर होती, असे समजते.

जोगेश्वरीत राहणाऱ्या फैजलला आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानातील प्रशिक्षण केंद्रात धाडणारा फारुख देवडीवाला छोटा शकीलचा विश्वासू हस्तक. सध्या शारजात असलेल्या फारुखने शकील, आयएसआयच्या इशाऱ्यावरून फैजलला मुंबईतून पाकिस्तानात धाडले, भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी प्रशिक्षित केले, अशी माहिती एटीएसच्या तपासातून पुढे आली आहे. फैजलने फारुखप्रमाणे मुंबई, दुबईत असलेल्या शकीलच्या अन्य विश्वासू साथीदारांची नावे एटीएसकडे उघड केली आहेत. यापैकी ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात राहणारा आणि राजकीय वलय असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर उर्वरितांपैकी एक फैजलच्या अटकेनंतर दुबईला पसार झाला. त्याच्या कुटुंबाकडे सध्या चौकशी केली जात आहे.

आयएसआयने शकीलच्या माध्यमातून देशाच्या विविध राज्यांमधील तरुणांना पाकिस्तानात बोलावून दहशतवादी हल्ल्यांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिल्याचा दाट संशय एटीएसला आहे. त्यामुळेच सध्या एटीएसकडून शकील टोळीची धरपकड सुरू आहे. दरम्यान, अल्लारखा, शकील टोळीतल्या गुंडांची धरपकड याबाबत एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

कुटुंबाला धक्का

फैजलने दुबईत नोकरी मिळाली असे सांगून घर सोडले. आई, मोठी वहिनी त्याला सोडण्यासाठी विमानतळावरही आल्या. प्रत्यक्षात तो दुबईत न जाता शारजाला गेला. तेथून पाकिस्तान, तेथील प्रशिक्षण, दहशतवादी हल्ल्याचा कट, तयारी या घडमोडींबाबत मिर्झा कुटुंब पूर्णपणे अनभिज्ञ होते. या भोवऱ्यात अडकवणारा फारुख फैजलचा आतेभाऊ. काही वर्षांपूर्वी जोगेश्वरीतल्या बेहराम बागेतल्या अवैध झोपडय़ांचे पाडकाम आरंभले तेव्हा फारुखच्या मदतीने फैजलने आपली झोपडी तुटण्यापासून वाचवली होती. ते उपकार आणि फारुखची ओळख, जीवनशैलीची भुरळ फैजलवर पडली असावी, असा अंदाज कुटुंबाला आहे.

फारुखला दुबईत अटक

फैजलला पाकिस्तानात धाडणाऱ्या फारुख देवडीवाला याला दुबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला एटीएसकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संयुक्त अरब अमिरातीसोबत भारताचा प्रत्यार्पण करार आहे. त्यानुसार जर दुबई पोलिसांनी फारुखला अटक केली असेल तर पुढल्या काही दिवसात तो भारताच्या ताब्यात दिला जाऊ शकेल. त्याच्या चौकशीतून एटीएससह देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांना आयएसआय, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली, मनसुबे, प्रशिक्षण घेऊन परतलेल्या भारतीय तरुणांची माहिती मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:32 am

Web Title: ats arrested suspected chhota shakeel gang member from gujarat
Next Stories
1 खासगी शाळांमधील विना‘टीईटी’ शिक्षक अपात्र?
2 मुख्य आरोपी असूनही भुजबळांना जामीन, तर मलाही द्या!
3 विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Just Now!
X