तळोजाजवळील कारखाना उद्ध्वस्त

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) १२९ किलो ‘एमडी’ या अत्यंत घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करत पाच जणांना बेडय़ा ठोकल्या. हस्तगत एमडी तळोजाजवळील वलप गावातील गोदामात तयार होत होते. या गोदामात अद्ययावत यंत्रसामग्री आढळली. विशेष म्हणजे तेथे झडती केली असता एटीएसच्या हाती एक कोटी रुपयांची रोकडही लागली. आरोपींनी एमडी विक्रीतून ही रक्कम कमावल्याचा संशय एटीएसला आहे. हस्तगत एमडीचे आंतरराष्ट्रीय मूल्य ५२ कोटी आहे, असे सांगण्यात आले.

जितेंद्र परमार ऊर्फ आसिफ, नरेश मस्कर, अब्दुल रझाक, सुलेमान शेख आणि इरफार शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परमार आणि मस्कर यांनी एमडी उत्पादनासाठी वलप गावातील गोदामाचा वापर केला. रझाक हा एमडीचा विक्रेता आहे, तर रझाकच्या आदेशानुसार सुलेमान आणि इरफान एमडीचा साठा मुंबईसह विविध ठिकाणी पोहोचविण्याचे काम करीत होता. एटीएसच्या विक्रोळी कक्षाला सोमवारी एमडीचा मोठा साठा शहरात येणार, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव, अनिल ढोले, गिरीश बने आणि पथकाने भांडुप पम्पिंग स्टेशन परिसरात सापळा रचून सुलेमान, इरफान यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नऊ किलो एमडी सापडले. त्यांच्या चौकशीत एमडीच्या कारखान्याबाबत पथकाला सुगावा लागला. पोलीस उपायुक्त  विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  छापा घातला.